Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
अटकपूर्व जामिनाची सुनावणी लांबणीवर
ऐक्य समूह
Friday, January 12, 2018 AT 11:13 AM (IST)
Tags: lo1
‘सुरुची’ राडा प्रकरणी संशयितांचे जबाब नोंदवण्याचे निर्देश
5सातारा, दि. 11 : सातार्‍यात गेल्या वर्षी ऑक्टोमध्ये कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री झालेल्या सुरुची राडा प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेल्या अटकपूर्व जामीन अर्जांवरील सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. या अर्जांवर 7 फेब्रुवारी रोजी पुढील सुनावणी होणार असल्याने संशयितांना आणखी दिलासा मिळाला आहे. अटकपूर्व प्रकरणातील संशयितांचे जबाब दि. 17 ते 22 जानेवारीपर्यंत घ्यावेत, असे निर्देशही उच्च न्यायालयाने पोलिसांनी दिले आहेत.
आनेवाडी टोलनाक्याच्या प्रश्‍नावरून आ. श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सुरुची या निवासस्थानाबाहेर  गेल्या वर्षी 5 ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री दोन्ही राजांच्या गटांमध्ये राडा झाला होता. या प्रकरणी सातारा पोलिसांनी अटकसत्र सुरू केले. त्यामुळे खासदार व आमदार गटातील अनेक समर्थक सातार्‍यातून पसार झाले. त्यातील काही जणांनी अटकपूर्व टाळण्यासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज केला होता. जिल्हा व सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आमदार गटातील समर्थकांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने आमदार समर्थकांना थोडा दिलासा देत अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला.     
सुरुची राडा प्रकरण 5 ऑक्टोबर रोजी झाले. त्यानंतर तब्बल दीड महिन्याने आमदार समर्थकांना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर झाला. त्यामुळे हे समर्थक सातार्‍यात परतले. या अटकपूर्व जामीन अर्जांवर पोलिसांना उच्च न्यायालयात बाजू मांडायची होती. मात्र, तिन्ही वेळा पोलिसांनी मुदत मागून घेतली होती. त्यावर गुरुवारी सुनावणी होती. सातारा पोलीस उच्च न्यायालयात काय बाजू मांडणार, याकडे सातारकरांचे लक्ष लागले असतानाच पोलिसांनी पुन्हा एकदा बाजू मांडण्यासाठी मुदत मागितली. त्यावर या प्रकरणात दोषारोपपत्रे दाखल झाल्याने आता पोलिसांनी वेळीच म्हणणे द्यावे, असे निर्देश न्यायालयाने दिले. तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर झालेल्या संशयितांचे जबाब दि. 17 ते 22 या कालावधीत घेण्याचे
निर्देशही न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत. पोलिसांनी म्हणणे मांडल्यानंतर या प्रकरणी पुढील सुनावणी दि. 7 फेब्रुवारी रोजी होणार आहे. तात्पुरता जामीन मिळालेल्यांमध्ये राजू भोसले, व्रिकम पवार, जयेंद्र चव्हाण, मयूर बल्लाळ, अमोल मोहिते, फिरोज पठाण यांचा समावेश आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: