Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
नोकरीच्या आमिषाने सव्वापाच लाखांना गंडा
ऐक्य समूह
Friday, January 12, 2018 AT 11:11 AM (IST)
Tags: re2
मलकापूर येथील कन्सल्टन्सी चालकावर गुन्हा
5कराड, दि. 11 : नोकरीच्या आमिषानेधोंडेवाडी, ता. कराड येथील युवकास 5 लाख 30 हजार रुपयांना गंडा घातल्या प्रकरणी मलकापूर, ता. कराड येथील सिद्धनाथ कन्सल्टन्सीचा संचालक अनिल दत्तात्रय कचरे याच्याविरुद्ध कराड शहर पोलीस ठाण्यात ठकबाजीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी सागर संभाजी ताटे (वय 28) याने फसवणूक झाल्याची फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, धोंडेवाडी येथील सागर ताटे हा युवक पदवीधर असून तो सध्या खाजगी नोकरी करत आहे. एका वृत्तपत्रातील नोकरी विषयक जाहिरात वाचून सागर याने वडील व भावास सोबत घेऊन मलकापूर येथील सिद्धनाथ कन्सल्टन्सीच्या प्रोप्रा. अनिल दत्तात्रय कचरे याला प्रत्यक्ष भेटून संपर्क साधला होता. त्यावेळी सागरने ओएनजीसी कंपनीत नोकरी करायची असल्याचे सांगितले होते. त्यावर, ओएनजीसी कंपनीत जागा उपलब्ध नसल्याने तुला जीएसटी भवन येथे नोकरी लावतो, असे अनिल कचरे याने सांगितले. मात्र, लिपिकपदाच्या नोकरीसाठी दहा लाख रुपये व टायपिंगचे बनावट प्रमाणपत्र तयार करण्यासाठी 30 हजार रुपये, असे एकूण दहा लाख 30 हजार रुपये द्यावे लागतील असे सांगितले. त्यावेळी ताटे कुटुंबीयांशी झालेल्या चर्चेअंती सात लाख 30 हजार रुपये देण्याचे ठरले.
त्यानुसार ताटे कुटुंबीयांनी 20 ऑक्टोबर 2017 रोजी अनिल कचरे याला अ‍ॅडव्हान्स म्हणून तीन लाख रुपये दिले. त्यानंतर दुसर्‍याच दिवशी मुंबईत सागर ताटे याची मुलाखतझाली. सागर याच्याकडून कचरे याच्या माध्यमातून अमित पाटील (रा. अमरावती) याने टायपिंग प्रमाणपत्रासाठी 30 हजार रुपये मुंबई येथे घेतले. त्यानंतर सागर यास तुझे काम झाले आहे, 2 लाख रुपये जमा कर तुला आज ऑर्डर देतो, असे कचरे याने सांगितले. त्यामुळे सागर याच्यावतीने त्याचे नातेवाईक देवानंद हुलवान यांनी दि. 26 ऑक्टोबर 2017 रोजी अनिल कचरे याच्याकडे दोन लाख रुपये जमा केले. त्यानंतर सागर मुंबई येथील सीएसटी रेल्वेस्टेशनवर असतानाच एका इसमाने त्याला महाराष्ट्र शासनाचा लोगो असलेले विक्रीकर विभागाचे लिपिकपदाचे नेमणूकपत्र दिले. मात्र, हे नेमणूकपत्र बनावट असल्याचे सागर याच्या निदर्शनास आले. त्यामुळे सागरने पत्र देणार्‍या इसमाकडे चौकशी केली असता, सविस्तर माहितीसाठी अनिल कचरे यास भेटा, असे त्याने सांगितले.
त्यानुसार दुसर्‍याच दिवशी सागर व त्याचे कुटुंबीय मलकापूर येथे सिद्धनाथ कन्सल्टन्सीच्या कार्यालयात जाऊन अनिल कचरे याला भेटले.   
त्यावेळी नेमणूकपत्र बनावट असल्याचे निदर्शनास आणून देताच कचरे याने सागर याच्याशी वाद घातला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने सागरने पैसे परत मागितले असता कचरे याने त्याला दम दिला. तुझे पैस परत देत नाही. तुला काय करायचे आहे ते कर, असा दम दिला, अशा आशयाची फिर्याद सागर ताटे याने कराड शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. यावरून अनिल कचरे याच्यावर ठकबाजीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कांबळे तपास करत आहेत.
 

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: