Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
सज्जनगड कासव तोडफोड प्रकरणी एकास अटक
ऐक्य समूह
Saturday, January 13, 2018 AT 11:27 AM (IST)
Tags: re1
5परळी, दि. 12 : सज्जनगडावर दहशत माजवत समर्थ रामदास स्वामींच्या समाधी मंदिरासमोर असणार्‍या पितळी आणि पंचधातूच्या कासवाची तोडफोड करून या कासवाचे धातूचे दोन पाय चोरून नेणार्‍या लक्ष्मण कुमार मनवे (वय-35), रा. सज्जनगड याला गुरुवारी रात्री तालुका पोलिसांनी अटक केली.
याबाबत माहिती अशी, की सज्जनगड येथील समर्थ रामदास स्वामी यांच्या समाधी मंदिर परिसरात बुधवारी रात्री लक्ष्मण मनवे याने खूप काळ दहशत माजवत मंदिरासमोर असणार्‍या पितळ आणि पंचधातूच्या कासवाची तोडफोड करून त्याचे मागील दोन पाय चोरून नेले होते. त्यानंतर त्याने त्याचा मोर्चा समाधी मंदिर पाठीमागे असणार्‍या धाब्याचा मारुती मंदिर रस्त्याकडे वळवला आणि या मार्गावरील ट्यूबलाईटचीही तोडफोड केली.  यावरच समाधानी न राहता त्याने परिसरात असणार्‍या गटारांची तोडफोड केली. 
गुरुवारी पहाटे मंदिरात येणार्‍या समर्थभक्त आणि ग्रामस्थ यांच्या निदर्शनास ही घटना आली. यानंतर परिसरात खळबळ उडाली. यानंतर रात्री उशिरा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक चेतन मचले आणि त्यांच्या सहकार्‍यांनी सज्जनगड येथे धाव घेत सादर प्रकरणाची माहिती घेत आरोपी असणार्‍या सज्जनगड येथील लक्ष्मण मनवे याला रात्री उशिरा अटक केली. त्याच्यावर धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा तपास पोलीस हवालदार सावंत करत आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: