Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पाच लाखांची खंडणी घेणार्‍या पाच महिलांवर गुन्हा
ऐक्य समूह
Thursday, February 08, 2018 AT 11:18 AM (IST)
Tags: re2
5कराड, दि. 7 : बलात्कार, विनयभंगाची तक्रार मागे घेण्यासाठी 5 लाख 5 हजार रुपये घेऊन पुन्हा एक लाख रुपयांची मागणार्‍या पाच महिलांवर कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाली आहे. या प्रकरणी राजेंद्र शिवाजी घारे-पाटील (रा. घारेवाडी, ता. कराड) यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, 2015 साली कोयना वसाहतीतील एका महिलेने राजेंद्र घारे यांच्याविरोधात कराड शहर पोलीस ठाण्यात बलात्काराची फिर्याद दाखल केली होती. त्यानंतर त्याच महिलेने 2016 मध्ये रत्नागिरी पोलीस ठाण्यात विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. दोन्ही प्रकरणे सध्या न्यायप्रविष्ट आहेत. दरम्यान, या महिलेसह तिच्या साथीदार महिलांनी घारे यांना फोन करून भेटायला बोलावले. तुमच्याविरोधातील तक्रार मागे घेतो, असे म्हणत त्यांनी पैशांची मागणी केली. आधी घारे यांनी त्या महिलेस तीस हजार रुपये दिले. त्यानंतर वेळोवेळी एकूण पाच लाख पाच हजार रुपये दिल्याचे घारे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पैसे देऊनही महिलेने तक्रार मागे घेतली नाही. याबाबत विचारल्यावर महिलांनी आणखी एक लाख रुपयांची मागणी केली.  
पैसे न दिल्यास विनयभंगाचा दुसरा गुन्हा दाखल करण्याची धमकीही दिली. त्यानंतर घारे यांनी कराड शहर पोलिसांकडे धाव घेतली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव तपास करत आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: