Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
व्याजदर जैसे थे; आरबीआयचे द्वैमासिक पतधोरण जाहीर
ऐक्य समूह
Thursday, February 08, 2018 AT 11:17 AM (IST)
Tags: na4
5नवी दिल्ली, दि. 7 (वृत्तसंस्था) : भारतीय रिझर्व्ह बँकेने बुधवारी नवे द्वैमासिक पतधोरण जाहीर केले आहे. यामध्ये व्याजदरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. रेपो रेट 6 टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे. रिव्हर्स रेपो रेटही 5.75 टक्क्यांवर जैसे थे ठेवण्यात आला आहे. सलग तिसर्‍यांदा भारतीय रिझर्व्ह बँकेने व्याजदरांमध्ये कोणताही बदल केलेला नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेल्या कच्च्या तेलाच्या किंमती आणि अर्थसंकल्पात केलेल्या अनेक नव्या घोषणांमुळे आरबीआय व्याजदर कमी करेल, अशी शक्यता तज्ञांकडून वर्तवली जात होती, पण अखेर बुधवारी आरबीआयने व्याजदरांमध्ये कोणताही बदल केला नसल्याचे जाहीर केले. 
रेपो रेट म्हणजे ज्या दराने बँका रिझर्व्ह  बँकेकडून अल्प मुदतीची कर्जे घेते तो दर.  रेपो रेट वाढणे म्हणजे बँकांना रिझर्व्ह बँकेकडून मिळणार्‍या कर्जदरात वाढ होणे तर रेपो रेट कमी होणे म्हणजे बँकेला स्वस्तात कर्ज मिळणे. म्हणजेच आरबीआयने रेपो रेट वाढवला तर पर्यायाने सर्व बँकांना ग्राहकांना द्यावयाच्या कर्जाचे दरही वाढवावे लागतात तर हा दर कमी झाल्याने व्याज दर कमी होतो. 
रिव्हर्स रेपो रेट म्हणजे रेपो रेटच्या अगदी उलट संकल्पना. बँका त्यांच्याकडे असलेला जास्तीचा निधी ठेवींच्या रूपात रिझर्व्ह बँकेकडे जमा करतात. या ठेवींवर रिझर्व्ह बँक बँकांना देत असलेल्या व्याजदराला रिव्हर्स रेपो रेट म्हणतात.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: