Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
वाळू तस्करांकडून सहा लाखांचा मुद्देमाल जप्त
ऐक्य समूह
Friday, February 09, 2018 AT 10:58 AM (IST)
Tags: re1
चितळी येथे चाँद नदीपात्रात पोलिसांचा छापा
5मायणी, दि. 8 : चितळी, ता. खटाव येथे पोलिसांनी बुधवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास वाळू तस्करांवर छापा टाकून, धाड घालून अवैध वाळू व वाळू वाहतुकीची पिक-अप वाहने मिळून 6 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या संदर्भात मायणी पोलीस दूरक्षेत्राकडून मिळालेली माहिती अशी, चितळी, ता. खटाव येथे चाँद नदीपात्रात बुधवारी (दि. 7) मध्यरात्री 1.30 च्या सुमारास आठ ते दहा पिक-अप वाहने उभी असून 15 ते 20 जण वाळू चोरून नेण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती मिळाली. त्यावेळी पोलीस शिपाई खाडे व पोलीस नाईक खांडेकर हे गस्तीवर होते. सपोनि. गोसावी यांनी या दोघांशी त्वरित संपर्क साधून या घटनेची कल्पना दिली. त्यानुसार पोलीस कर्मचारी चाँद नदीपात्रात गेले असता, तेथे आठ ते दहा पिक-अप वाहनांमध्ये 15 ते 20 जण वाळू भरताना दिसले. पोलिसांची चाहूल लागताच या सर्वांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन वाहनांसह पलायन केले. मात्र, पोलिसांनी अत्यंत शिताफीने त्यातील टाटा पिक-अप (एमएच- 50-बीएच-1568) व दुसरे क्रमांक नसलेले पिक-अप वाहन पकडले. क्रमांक नसलेल्या वाहनावर ‘मेरा भारत महान’ असे वाक्य लिहिलेले होते. ही दोन्ही वाहने व वाळू मिळून पोलिसांनी 6 लाख 10 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यातील एका वाहनचालकाचे नाव सूरज सोपान जाधव तर दुसर्‍या वाहनचालकाचे नाव गोपाळ मनोहर पाटोळे असे आहे. या प्रकरणी अद्याप कोणासही ताब्यात घेण्यात आलेले नाही.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: