Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
अयोध्या हा फक्त जमिनीचा वाद
ऐक्य समूह
Friday, February 09, 2018 AT 10:59 AM (IST)
Tags: na1
सुप्रीम कोर्टात आता 14 मार्चला सुनावणी
5नवी दिल्ली, दि. 8 (वृत्तसंस्था) : अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशीद वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. मात्र, या प्रकरणातील अनेक कागदपत्रे व भाषांतर न्यायालयात अद्याप सादर झाले नसल्याने या प्रकरणाची सुनावणी 14 मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. दरम्यान, अयोध्येतील प्रकरणाकडे आस्थेच्या नव्हे तर जमिनीच्या वादासारखेच पाहिले जाईल, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी प्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाने 2010 मध्ये दिलेल्या निकालाला आव्हान देणार्‍या याचिकांवर गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्या. अशोक भूषण व न्या. एस. ए. नजीब यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी सर्व पक्षकारांनी या प्रकरणाशी संबंधित संपूर्ण कागदपत्रे दोन आठवड्यात सादर करावीत, असे निर्देश खंडपीठाने दिले. या प्रकरणी   पुढील सुनावणी 14 मार्च रोजी होणार आहे.
अलाहाबाद उच्च न्यायालयाने अयोध्या प्रकरणात ऑक्टोबर 2010 रोजी निर्णय दिला होता. हिंदू आणि मुस्लीम समाजाची या जागेवर संयुक्त मालकी असल्याचे निकालात म्हटले होते. वादग्रस्त 2.7 एकर जमिनीत सुन्नी वक्फ बोर्ड, निर्मोही आखाडा आणि रामलल्ला यांना प्रत्येकी एक तृतीयांश भाग द्यावा, असा निकाल उच्च न्यायालयाने दिला होता. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.
सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी श्रद्धा किंवा भावनेच्या आधारे विचार न करता दोन पक्षांमधील जमिनीचा वाद म्हणून या प्रकरणाकडे पाहिले जाईल, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे या वादाच्या शतकानुशतकांच्या ऐतिहासिक व धार्मिक पैलूंचा विचार होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: