Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  अग्रलेख  >>  बातम्या

आ, बैल मुझे.. मार
vasudeo kulkarni
Friday, February 09, 2018 AT 11:03 AM (IST)
Tags: ag1
राष्ट्रपती गोविंद कोविद यांच्या अभिभाषणावर आभार प्रदर्शक ठरावाच्या मंजुरीच्या चर्चेत संसदेत काँग्रेससह विरोधी पक्षांच्या नेत्यांनी, सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या कारभारावर टीकेची झोड उठवली खरी, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या चर्चेला उत्तर देताना केलेल्या घणाघाती-आक्रमक भाषणामुळे काँग्रेसची स्थिती, मात्र ‘आ बैल मुझे मार’ अशी झाली. गेल्या दोन वर्षात काँग्रेसच्या नेत्यांनी आणि विशेषत: पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी यांच्यावर  व्यक्तिगत टीका करणार्‍या हल्ल्यांचे जोरदार सत्र सुरू ठेवले. गुजरातच्या विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला अधिक जागा  मिळाल्याने राहुल गांधी यांचे हवेत उडायला लागलेले विमान अद्यापही जमिनीवर उतरलेले नाही. लोकसभेत ते फारसे कधी बोलत नाहीत. पण, त्यांचे गांधी घराण्याशी अति एकनिष्ठ असलेले सहकारी आणि नेते मात्र त्यांचा जयजयकार करीत घराणेशाहीचे निर्ल्लज्जपणे समर्थन करतात. मोदी आणि त्यांच्या पक्षाला प्रतिगामी अशी शिवीगाळ करताना, त्यांना आपल्या पायाखाली काय जळते, याचे भानही राहात नाही. मोदी सहसा आपल्यावर होणार्‍या टीकेला प्रत्युत्तर देत नाहीत. ते शांत राहतात. काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांच्या बदनामीसाठी उघडलेल्या मोहिमेकडेही ते दुर्लक्ष करतात. पण, राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या आभार प्रदर्शक ठरावाच्या निमित्ताने विरोधकांनी आपल्या मर्यादा सोडून मोदी यांच्यावर तुफानी टीका केली.  मोदी हे धर्मांध आणि लोकशाही विरोधी असल्याचा जोरदार हल्ला चढवला. मोदींच्या सरकारच्या कारकिर्दीत देशातल्या शेतकर्‍यांचे वाटोळे झाल्याचेही आरोप झाले. बँकांची कर्जे बुडाली त्यालाही जबाबदार. मोदी सरकार देशात जे काही वाईट घडले, त्याची जबाबदारी याच सरकारची, असा विरोधकांचा पवित्रा होता. पण, मोदी यांनी आपल्या घणाघाती भाषणात काँग्रेससह विरोधकांचा समाचार घेताना, त्यांच्या आरोपांनाही चोख प्रत्युत्तर देत, त्यांचेच दात त्यांच्या घशात घातले. मोदी भाषण करीत असताना काँग्रेसचे खासदार राहुल गांधींना खूश करायसाठी घोषणाबाजी करीत होते. पण, त्यांच्या या गोंधळाचा काहीही उपयोग झाला नाही. मोदींच्या मुलूखमैदान तोफेच्या हल्ल्यात काँग्रेससह सारेच विरोधक गारद झाले. त्यांची तोंडे बंद झाली. संसदेत मूग गिळून बसलेल्या राहुल गांधींना बाहेर पडल्यावर कंठ फुटला. शेतकर्‍यांचे भवितव्य, तरुणांना रोजगार, राफेल घोटाळा झाला की नाही, याची उत्तरे मोदींनी द्यायला हवीत, अशी मागणी त्यांनी केली. मोदींचे दीड तासाचे लोकसभेतले हे भाषण म्हणजे काँग्रेस पक्षाच्या केंद्रातल्या सरकारांच्या कारकिर्दीचा जाहीर पंचनामा ठरला. काँग्रेसची पापे संसदेच्या चव्हाट्यावर टांगायला आणि नव्या पिढीसमोर आणायला मोदी यांना अचूक संधी मिळाली आणि त्यांनी ती घेतलीही. मोदींचे भाषण काँग्रेससह विरोधकांना नक्कीच झोंबले असेल.

पापांचे पुरावे
काँग्रेस आणि विरोधकांनी केंद्र सरकारवर जे, जे आरोप केले, ते पाप आधीच्या काँग्रेस सरकारांचेच कसे आहे, हे मोदींनी पुराव्यासह आपल्या भाषणात  सांगितले.  देशात जे काही वाईट झाले, ते सारे मोदी सरकारमुळे, असा आरोप करणार्‍या काँग्रेसच्या केंद्रातल्या सरकारांच्या कारकिर्दीतच देशाचे पुरते वाटोळे झाल्याचा तुफानी हल्लाही त्यांनी चढवला. देशातल्या  बँकांच्या अठरा लाख कोटी रुपयांच्या बुडीत कर्जाचे पाप काँग्रेसच्या सरकारांचेच आहे. सरदार वल्लभभाई पटेल हे पहिले पंतप्रधान असते, तर  जम्मू काश्मीरचा भाग पाकिस्तानात गेलाच नसता. देशाची फाळणी याच काँग्रेस पक्षाने घडवली.  या पक्षाने घराणेशाही पोसली आणि गांधी घराण्याशिवाय देशाला कोणी तारणहार नाही, असा प्रचार करत स्वत:च्या तुंबड्या भरल्या. ज्यांनी देशाचा घात केला, त्यांनी राष्ट्रहिताच्या गोष्टी सांगू नयेत, असे बजावत त्यांनी काँग्रेसमुक्त भारत हे महात्मा गांधीजींचे स्वप्न होते, त्याची पूर्तता करायचा आमचा प्रयत्न आहे. काँग्रेसवाले जुना भारत म्हणजे काँग्रेसच्या कारकिर्दीतल्या जुन्या भारताची मागणी करीत आहेत. आणीबाणी घोटाळे, शिखांची हत्याकांडे असलेला जुना भारत हवा की भाजपचा नवा भारत हवा, हे काँग्रेसवाल्यांनी ठरवावे. पण जनतेनेच यांना सत्तेबाहेर हाकलले आहे. जनतेचा या स्वार्थांध सत्तेच्या दलालांवर विश्‍वास राहिलेला नाही. आपण पाप करायचे आणि त्याचे खापर मात्र सध्याच्या सरकारवर फोडायचे हे चालणार नाही, असेही आक्रमकपणे ते म्हणाले आहेत. जे काही चांगले घडले त्याचे श्रेय लाटायला धावणारे काँग्रेसवाले आपल्या सरकारांच्या कारकिर्दीतल्या निर्णयांच्या अंमलबजावणीने देशाच्या झालेल्या नुकसानीची जबाबदारी मात्र स्वीकारायला तयार नाहीत. त्यांनी आता कितीही गोंधळ घातला, भाषणबाजी केली, लोकांना फसवायसाठी वेगवेगळी कटकारस्थाने केली, तरी जनता त्यांना फसणार नाही. पंतप्रधानांनी राजकीय भाषण दिल्याच्या राहुल गांधी यांच्या आरोपात काही तथ्य नाही. मोदींना लक्ष्य करून काँग्रेसच्याच नेत्यांनीच डिवचल्याने, त्यांच्यावर व्यक्तिगत आरोपांची राळ उडवल्यानेच त्यांनी या सार्‍या बदनामीकारक आरोपांची पुराव्यासह चोख प्रत्युत्तरे दिली आणि त्यांना तो अधिकारही आहेच. मोदींच्यावर आम्ही वाटेल तेवढे आरोप करणार आणि सरकारला बदनामही करणार, पण त्यांनी मात्र काँग्रेस सरकारांच्या कारकिर्दीत देशाला खड्ड्यात घालणारे निर्णय कसे घेतले गेले, याचा पंचनामा मात्र करता कामा नये, ही काँग्रेसच्या नेत्यांची झुंडशाही लोकशाहीचे लक्षण नाही. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कारकिर्दीत देशावर आणीबाणी लादली गेली. घटनेने दिलेल्या मूलभूत स्वातंत्र्यासह मूलभूत हक्क हिरावले गेले. दोन लाख विरोधकांना कोणत्याही कारणाशिवाय तुरुंगात डांबले गेले. त्याकाळात देशाचाच तुरुंग झाला. घटनेची मोडतोड झाली. हे सारे इंदिरा गांधींनी आपल्या व्यक्तिगत राजकीय स्वार्थ आणि सत्तेसाठी केले होते. ज्यांनी राज्यघटनेचा, लोकशाहीचा क्रूरपणे गळा घोटला त्यांनीच लोकशाहीच्या नावाने टाहो फोडून हंबरडा फोडणे, म्हणजे पुतना मावशीला कृष्णासाठी फुटलेल्या पान्ह्याचा प्रकार होय. काँग्रेसच्या कारकिर्दीत देशाची प्रगती झाली. पण, सत्ता हेच राजकीय पक्षांच्या राजकारणाचे ध्येय झाले. लोकशाहीला आणि सरकारला भ्रष्टाचार, गैरव्यवहाराचे ग्रहण लागले. भ्रष्टाचार हा शिष्टाचार झाला. जुने संस्थानिक संपले. पण, नवे राजकारणी संस्थानिक निर्माण झाले. त्यांच्या जहागिर्‍या निर्माण झाल्या. राजकारणात घराणेशाही आली. जनतेची प्रचंड लूट झाली. या सार्‍या अनर्थाचे पाप देशात आणि राज्यात बहुतांश काळ सत्तेवर असलेल्या काँग्रेस पक्षाच्या  सरकारचेच आहे, हे सत्य कसे लपवणार? 
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: