Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
‘शांतीदूत’ सातार्‍यातच; आयजींचे सातारकरांच्या उद्रेकापुढे काही चालेना
ऐक्य समूह
Saturday, February 10, 2018 AT 11:15 AM (IST)
Tags: lo2
शांतीदूताचा पुतळा हटवण्याचा उद्योग सूडबुद्धीतून, प्रसंगी आंदोलनही करणार : खोपडे
5सातारा, दि. 9 : सातारकरांच्या संतापापुढे जिल्हा पोलिसांना मान तुकवावी लागली आहे. सातारकरांच्या उद्रेकापुढे आयजींचेही काही चालले नाही. अखेर पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांना ‘शांतीदूत’ सातार्‍यातच ठेवणार असल्याचा निर्णय पत्रकातून जाहीर करावा लागला आहे. त्यामुळे शांतीदूताचा पुतळा कोल्हापूरला हलवण्याचा निर्णय बारगळला असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र एवढ्याने हा विषय संपणार नाही. पोलीस मुख्यालयासमोरील आहे त्या जागेवरच ‘शांतीदूत’ ठेवण्याचा निर्णय पोलीस घेत नाहीत तोपर्यंत सातारकर स्वस्थ बसणार नाहीत हेही स्पष्ट झाले आहे. दरम्यान, सूडबुद्धीतून सातार्‍यातील शांतीदूताचा पुतळा हटवण्याचा उद्योग झाला आहे. यामागे कोल्हापूरचे आयजी विश्‍वास नांगरे-पाटील आहेत. पुतळा हलवण्याचे काम चुकीचे झाले आहे. पुतळा त्याच जागी राहिला पाहिजे. सातारकरांचा तो अभिमान बनला आहे. मग अभिमान दुसरीकडे किंवा इतरत्र कशासाठी? तो जेथे आहे तेथेच राहिला पाहिजे. आपण या सर्व प्रकारामुळे अस्वस्थ झालो असून लवकरच सातार्‍याला जाणार आहे. तेथील नागरिकांशी चर्चा करून पुतळा पुन्हा तेथेच लावला जावा, याबाबतचे मत आजमावून घेणार आहे. लोकमताचा निर्णय पाहून प्रसंगी त्यासाठी लोकशाही मार्गाने आंदोलनही केले जाईल, असा इशारा माजी पोलीस अधीक्षक सुरेश खोपडे यांनी दैनिक ऐक्यशी बोलताना दिला.
गुरुवारी रात्री अचानक गुपचूपपणे पोलीस मुख्यालयासमोरील शांतीदूत हलवण्याचे काम पोलिसांनी जेसीबीच्या सहाय्याने सुरू केले. गुपचुप सुरू असलेले हे काम माध्यमांनी उघड केले. त्यानंतर माध्यमांमधील प्रतिनिधी मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले. दरम्यानच्या काळात सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे, रवी कांबळे, पत्रकार प्रशांत जगताप यांनी या कामाला विरोध केला.  
सुशांत मोरे यांनी शांतीदूताचा पुतळा हटवण्याचे पत्र दाखवा. पुतळा कोठे घेवून जाणार आहात त्याचा आदेश दाखवा, अशी मागणी केली. त्यानंतर पोलीस दल हडबडून गेले. कॅमेर्‍यासमोर काहीही बोलण्याची त्यांची तयारी नव्हती. काम तेथेच टाकून ते निघून गेले. त्यानंतर  चार पोलीस अधिकारी आणि पन्नास पोलीस कर्मचारी असा ताफा तेथे आला. आंदोलकांची समजूत घालण्यात आली. पुतळा कोठेही हलवणार नाही, सातार्‍यातच ठेवण्यात येईल, असे आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलन थांबवण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी सोशल मीडियावर पुतळा सातार्‍यातच ठेवणार असल्याचे अधिकृतपणे जाहीर केले. त्यानंतरही पुतळा तेथून हलवला जाईपर्यंत सर्व माध्यमांचे प्रतिनिधी आणि आंदोलक तेथे तळ ठोकून होते. रात्री 1 च्या सुमारास मुख्यालयाच्या पाठीमागील बाजूच्या मैदानावरील जागेत पुतळा हलवण्यात आला. मात्र हा पुतळा कोल्हापूरला हलवला जाईल, अशीभीती सातारकरांच्या मनात होती. सकाळपासून दुपारपर्यंत अनेक सामाजिक संघटनांनी जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांना निवेदन देवून पुतळा सातार्‍यातच ठेवावा, अशी मागणी केली. त्यामध्ये शिवसेनेचे शहरप्रमुख बाळासाहेब शिंदे, सुशांत मोरे, गणेश दुबळे, आपचे सागर भोगावकर यांचा समावेश होता. त्यानंतर चक्रे हलली आणि जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या आवाहनाचे एक निवेदन पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी सोशल मीडियावर जाहीर केले. या सर्व पार्श्‍वभूमीवर सुरेश खोपडे म्हणाले, सातारा शिवरायांची भूमी आहे. शांतीदेवता पुतळा हा सातार्‍याची अस्मिता बनला होता व सर्वसामान्यांना हा परिसर आपलासा वाटत होता. पोलीस दलात सुधारणा झाल्या पाहिजेत यासाठी पोलीस दलात असल्यापासून व आज निवृत्त झाल्यानंतरही आपण प्रयत्न करत आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी आपण लेख लिहिले आहेत. याशिवाय सोशल मीडियाच्या माध्यमातून पोलीस दलाविषयी लिखाण करत आहे. मंत्रालयातही 2015 मध्ये आपण एक अहवाल दिला असून त्याबाबतही अद्याप कोणतीही दखल घेतली गेली नाही. कोणत्याही क्षेत्रातील बदल ही काळाची गरज असते. त्यामुळेच सकारात्मक बाजू घेतली जाईल या विचाराने लिखाण करण्याचे काम करत आहे. दुर्दैवाने मात्र पोलीस दलातील काही जणांकडून त्याचा द्वेष   केला जात असून त्याच सूडबुद्धीतून सातार्‍यातील शांतीदूताचा पुतळा हटवण्याचा उद्योग झाला आहे. सातारा जिल्ह्याचा चार्ज घेतल्यानंतर मुख्यालयाच्या इमारतीबाहेर चार तोफा होत्या. सर्वसामान्यांवर अन्याय झाल्यानंतर अन्यायग्रस्त न्याय मिळण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात येतात. मात्र बाहेर तोफा पाहिल्यानंतर न्याय मिळणार का अशी अनेकदा त्यांच्या मनात भावना यायची. ही बाब आपल्यासमोर आल्यानंतर त्यावर विचारमंथन केले व तोफा हटवण्याचे निश्‍चित केले. तोफा हटवून त्या जागी काय करता येईल असा विचार सुरू असतानाच त्यातूनच शांततेचे प्रतीक असणार्‍या शांतीदूत पक्षाचा जन्म झाला. बंदूक, गोळ्या या माध्यमातून दहशतीवर निश्‍चित वचक राहिला पाहिजे. अशा साधनेतूनच शांततेचे प्रतीक उभारले जावे यासाठी बंदूकीची काडतुसे वितळवून शांततेचे प्रतीक उभारण्यासाठी पुणे येथील एका कारागिराला काम देण्यात आले. बंदुकीची काडतुसे पोलीस दलाकडे होतीच यामुळे अधिक खर्चाचा विषय नव्हता. सुरुवातीला पक्ष्याचे पंख, शेपूट, डोळे, पाठीमागची बाजू अशा  सुट्या भागांनी हा पुतळा बनवला असून अंतिम सर्व भाग एकत्र करून ते जोडण्यात आले. शांततेचे हे प्रतीक तयार करताना अर्थातच टीम वर्कचे काम होते. पोलीस सहकार्‍यांशिवाय हे काम अशक्यप्रायच होते. त्यावेळी सातारा पोलीस दलातील प्रत्येक पोलिसाने हे काम माईलस्टोन कसे होईल या विचाराने कामाला सुरुवात केली. पोलीस दल हे शिस्तीचे आहेच पण त्यातून शांततेचे प्रतिबंबही दिसले पाहिजे. शांतीदूताचा पुतळा झाल्यानंतर पोलिसांप्रती शांततेचे प्रतिबंब अधोरेखित झाले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: