Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
नागठाणे येथील दोन मोबाईल शॉपीत चोरी
ऐक्य समूह
Monday, February 12, 2018 AT 11:07 AM (IST)
Tags: re2
चोरटा सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद
5देशमुखनगर, दि. 11 : नागठाणे, ता. सातारा येथे शनिवारी रात्री उशिरा अज्ञात चोरट्याने बाजारपेठेतील दोन मोबाईल शॉपी फोडून सुमारे 20 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरुन नेला. दरम्यान, एका मोबाईल शॉपीत असणार्‍या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात हा चोरटा कैद झाला आहे. भर बाजारपेठेतील दोन दुकानात चोरी झाल्याने गावात चांगलीच खळबळ उडाली आहे.
याबाबत बोरगाव पोलीस व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, नागठाणे येथील स्वागत कमानीजवळ सचिन साळुंखे यांची साक्षी मोबाईल शॉपी आहे. अज्ञात चोरट्याने रात्री या दुकानाच्या पत्र्याची बोल्ट काढून प्लायवूडचे सिलिंग तोडून दुकानात प्रवेश केला.
यावेळी चोरट्याने दुकानातील तिजोरी फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. त्यानंतर काउंटरचे ड्रॉवर तोडून आतील सुमारे 2 हजार रुपये व काही किरकोळ साहित्य चोरले. चोरट्याने यावेळी तेथील मोबाईल बॉक्सना हातही लावला नाही. त्यानंतर चोरट्याने तेथून थोड्याच अंतरावर सासपडे चौकात असणार्‍या श्री गणेश मोबाईल शॉपीचे कुलूप तोडून तेथून एक मोबाईल, चार पॉवर बँक, पाच हेडफोन व रोख दोन हजार रुपये असा सुमारे 20 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. दरम्यान, साक्षी मोबाईल शॉपीत सीसीटीव्ही कॅमेरे असल्याने चोरटा त्यामध्ये कैद झाला आहे. या घटनेची फिर्याद बोरगाव पोलीस ठाण्यात दाखल झाली असून पुढील तपास हवालदार आर. बी. यादव करत आहेत.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: