Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
सुंजवामध्ये 4 दहशतवाद्यांना कंठस्नान; 5 जवान शहीद
ऐक्य समूह
Monday, February 12, 2018 AT 10:53 AM (IST)
Tags: na1
कारवाई अखेर संपली; एका स्थानिकाचाही मृत्यू
5जम्मू, दि. 11 (वृत्तसंस्था) : जम्मू-पठाणकोट मार्गावर असलेल्या सुंजवा लष्करी तळावर शनिवारी पहाटे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यातील शहीद जवानांच्या संख्येत वाढ झाली आहे. आतापर्यंत 5 जवान शहीद झाले आहेत. 4 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात लष्कराला यश आले आहे. याबरोबरच एका स्थानिक नागरिकालाही या हल्ल्यामध्ये आपले प्राण गमवावे लागले आहेत. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने हा हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. पहाटे पाच वाजता लष्करी तळावर असलेल्या स्टाफ क्वार्टरवर दहशतवाद्यांनी हा हल्ला केला होता.
शनिवारपासून सुंजवामधील परिस्थिती लक्षात घेऊन जम्मू शहरात रेड अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला होता. या परिसरात सुरक्षा रक्षकांचा वेढाही वाढवण्यात आला आहे. दहशतवाद्यांविरोधातील कारवाई अखेर संपली आहे. काश्मीर खोर्‍यात लष्करी छावण्या व तळांवर दहशतवादी हल्ला होण्याचा इशारा गुप्तचर संघटनांनी सुरक्षा दलांना दिला होता. पण दहशतवाद्यांनी खोर्‍याऐवजी जम्मू शहरातील सुंजवान लष्करी तळाला लक्ष्य केले. शनिवारी पहाटे पाचच्या सुमारास तळाच्या मागील बाजूकडील निवासी भागातून जैश-ए-मोहम्मद संघटनेचे चार ते पाच दहशतवादी आत शिरले. त्यांनी गोळीबार सुरू केला. सुरक्षा रक्षकांनीही त्यांना प्रत्युत्तर दिले. चकमकीत दोन जवान शहीद झाले. लष्कराने तातडीने सर्व रहिवासी इमारती रिकाम्या करून जवानांच्या कुटुंबीयांना सुरक्षित स्थळी हलवले. त्यानंतर शोध मोहीम हाती घेतली. रात्री लष्करप्रमुख बिपीन रावत हे देखील सुंजवान येथे पोहोचले. 30 तास उलटूनही शोध मोहीम सुरूच आहे. आणखी एक ते दोन दहशतवादी लपून बसल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, दहशतवाद्यांशी लढताना आतापर्यंत पाच  जवानांना वीरमरण आले आहे. तर एका नागरिकाचाही मृत्यू झाला आहे. लष्कराने शोध मोहिमेदरम्यान चार दहशतवाद्यांना ठार केले आहे.
लष्कराचे जवान सावधपणे शोध मोहीम राबवत आहेत. प्रत्येक नागरिकाचा जीव आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. लवकरच मोहीम संपवू, असा विश्‍वास जम्मूचे पोलीस महानिरीक्षक एस. डी. सिंह जामवाल यांनी व्यक्त केला. मोहीम अद्याप सुरूच आहे. सध्या मोहिमेबाबत बोलणे उचित ठरणार नाही. मात्र, आपले जवान मोहीम यशस्वी करतील, असा विश्‍वास केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: