Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
केरा नदीचे पात्र बनले डंपिंग ग्राऊंड!
ऐक्य समूह
Monday, February 12, 2018 AT 11:09 AM (IST)
Tags: re3
5पाटण, (नितीन खैरमोडे यांजकडून) दि. 11 : कराड-चिपळूण राज्य मार्गावर पाटण शहराच्या प्रवेशद्वारावरच असणार्‍या केरा पुलाखाली केरा नदीच्या पात्रात कचर्‍याचे साम्राज्य निर्माण झाल्याने नदीपात्रातील प्रदूषणाने कळस गाठला आहे.
शहरातील काही व्यापारी, दुकानदार, मटण, चिकन सेंटरची घाण, प्लास्टिकचा कचरा सर्रासपणे दररोज केरा पुलाखाली टाकत असल्याने नदीचे पात्र कचर्‍याने व्यापून गेले आहे. गेल्या कित्येक वर्षापासून केरा नदीच्या पात्राचा उपयोग हा कचरा टाकण्यासाठीच होत असल्याने केरा नदीचे पात्र सध्या पाटण शहरवासीयांसाठी डंपिंग ग्राऊंड बनले आहे. पाटण नगरपंचायतीने याकडे गांभीर्याने लक्ष देवून केरा नदी पात्रात स्वच्छता मोहीम हाती घेण्याची गरज आहे. तसेच नदीपात्रात उघड्यावर घाण टाकणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करून ठोस उपाययोजना राबविण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
पाटण शहर हे केरा आणि कोयना नदीच्या पवित्र संगमावर वसलेले छोटेसे गाव आहे. कोयना नदी ही महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजली जाते.  कोयना नदीच्या पाण्यावरच कोयनानगर येथे वीजनिर्मिती केली जाते. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र उजळून निघाला आहे. कोयना नदीकाठावर असणार्‍या अनेक गावांची तहानही कोयनेच्या पाण्यामुळे भागविली जाते. तसेच कोयनाकाठावरील हजारो एकर शेती कोयनेच्या पाण्यामुळे ओलिताखाली आलेली आहे. त्यामुळे कोयना नदीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र प्रशासकीय यंत्रणेचा हलगर्जीपणा आणि लोकप्रतिनिधींच्या निद्रावस्थेमुळे केरा-कोयना नदीच्या संगमात कचरा टाकला जात आहे व हीच बाब नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम करत आहे.
कोयना नदीच्या पाण्यामध्ये केरा नदीचे दूषित पाणी मिसळत असल्याने कोयना नदीचे पाणी दूषित होवून नदीकाठच्या ग्रामस्थांचा आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. अनेक गावांच्या नळपाणी पुरवठा योजनेच्या विहिरी कोयना नदीकाठावरच असल्याने सार्वजनिक आरोग्याचा प्रश्‍न निर्माण होण्याची भीती निर्माण झाली आहे.
 पाटण शहराचे प्रवेशद्वार असणार्‍या तसेच केरा-कोयना नदीच्या पवित्र संगमाजवळच ब्रिटीशकालीन केरापूल असून या पुलाने शंभरी ओलांडली आहे.       मात्र सध्या या पुलाला ग्रहण लागले असून हा पूल घाणीच्या विळख्यात सापडला आहे. पुलाखाली परिसरातील व्यापारी, नागरिक आणि ये-जा करणारे प्रवासी कचर्‍याने भरलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या आणि पोती टाकत असल्याने येथे उकिरंड्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. ट्रॉली-ट्रॉली भरून नदीपात्रात घाण टाकली जात असल्याने येथे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. पुलाखाली ठिकठिकाणी कचर्‍याचे ढीग लागल्याने केरा नदीचे पात्र कचर्‍याचे डंपिंग ग्राउंड बनले आहे. पावसाळ्यामध्ये केरा नदीचे पात्र दुथडी भरून वाहत असते. त्यावेळी नदीचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी पाटण शहरासह परिसरातील लोक पाटणच्या प्रवेशद्वारावर केरा पुलावर गर्दी करत असतात. उन्हाळ्यामध्ये मात्र केरा नदीचे पात्र पूर्णपणे उघडे पडते. त्यामुळे कचरा तसेच इतर साहित्य नदीच्या पात्रात टाकले जाते. त्यामुळे केरा नदीचे रूपच बदलून गेले आहे.
केरा नदीच्या स्वच्छतेकडे लक्ष न दिल्याने केरा नदीचे पात्र काटेरी झुडपांनी व्यापून गेले आहे. तसेच केरा नदीच्या पात्रात शहरातील व्यापारी, दुकानदार, हॉटेल व्यावसायिक, मटन, चिकन सेंटरची घाण, मेलेली जनावरे, प्लास्टिकचा कचरा मोठ्या प्रमाणात टाकला जात आहे. त्यामुळे पाटण शहरात प्रवेश करतानाच उग्र स्वरूपाच्या वासाला सामोरे जावे लागते. केरा नदी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली असून केरा नदी कचरामुक्त करण्यासाठी नदीपात्रात कचरा व घाण टाकणार्‍यांवर पाटण नगरपंचायतीने दंडात्मक कारवाई करणे गरजेचे आहे. शहरातील कचरा हा कचरा कुंडीतच टाकावा असे आवाहन नगरपंचायतीकडून केले जाते. त्याच धरतीवर केरा नदीपात्रात कचरा टाकू नये असे आवाहन नगरपंचायतीने ध्वनीक्षेपकाद्वारे करणे गरजेचे आहे. केरा नदीच्या स्वच्छतेबाबत पाटण नगरपंचायतीने ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. नदीच्या पात्रात कचरा टाकण्यास प्रतिबंध केला जात नसल्यामुळेच ही परिस्थिती निर्माण झाली आहे. केरा नदी स्वच्छ व सुंदर करण्यासाठी पाटणमधील सामाजिक संस्थांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. तसेच शहरातील नागरिकांनीही पाटण शहराच्या स्वच्छतेबाबत काळजी घेणे गरजेचे आहे.
मोदी सरकारने स्वच्छतेला अग्रक्रम देण्यासाठी देशभरात स्वच्छ
भारत अभियान सुरू केले आहे. याचीच दखल घेत स्वच्छ भारत अभियानामध्ये शहरातील कचरा संकलनाला चालना दिली
जात आहे. परिणामी पाटण नगरपंचायतीकडून प्रत्येक वॉर्डात कचराकुंड्या ठेवल्या गेल्या आहेत. त्यामुळे ग्रामस्थही कचराकुंड्यात
कचरा टाकत आहेत. तसेच दोन दिवसातून एकदा नगरपंचायतीची घंटागाडीही शहरातून फिरत आहे.  त्यामुळे कचर्‍याच्या समस्येवर तोडगा काढल्याने शहरातील कचरा साफ झाला. मात्र  जलवाहिनी असणार्‍या केरा नदीपात्रातील कचरा कधी साफ होणार? केरा नदीपात्रातील प्रदूषणाला अटकाव करण्यासाठी पाटण नगरपंचायतीने तातडीने प्रयत्न करणे गरजेचे आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: