Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
‘शांतिदूत’ यापूर्वी होता त्याच जागेवर बसवणार
ऐक्य समूह
Tuesday, February 13, 2018 AT 10:56 AM (IST)
Tags: lo1
सातारकरांच्या लोकभावनेचा आदर करून पोलीस अधीक्षकांचा निर्णय
5सातारा, दि. 12 : कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांच्या सूचनेनुसार सातार्‍यातील पोलीस मुख्यालयासमोरील शांतिदूताचा पुतळा कोल्हापूरला हलवण्याचा निर्णय अखेर पोलीस दलाला मागे घ्यावा लागला आहे. सातारकरांच्या दबावापुढे पोलीस दलाला झुकावे लागले आहे. शांतिदूताचा पुतळा यापूर्वी ज्या जागेवर होता त्याच जागेवर पुन्हा बसवण्याचा निर्णय घेवून पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी लोकभावनेचा आदर केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी,  चार दिवसांपूर्वी रात्रीच्या अंधारात शांतिदूत गुपचूपपणे हटवण्याचे कटकारस्थान रचण्यात आले होते. सातार्‍यातील शांतिदूत कोल्हापूरला हलवण्याचे आदेश आयजींनी दिले होते. या आदेशानुसार जिल्हा पोलीस दलाने रात्रीच्या अंधारात शांतिदूत हटवून कोल्हापूरला नेण्याचा प्रयत्न सुरू केला होता. मात्र त्याचवेळी सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे, रवींद्र कांबळे, पत्रकार प्रशांत जगताप यांनी शांतिदूतासमोरच ठिय्या आंदोलन करुन शांतिदूत हलवण्याला विरोध केला होता. त्यानंतर सोशल मीडियावर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी पुतळा सातार्‍यातच पोलीस मुख्यालयाच्या पाठीमागील जागेत बसवणार असल्याचे जाहीर करुन पुतळा कोल्हापूरला हलवणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले होते. त्यानंतरही पुतळा आहे त्या जागेवरच बसवावा, अशी भूमिका सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकारांनीही घेतली होती.
विविध संघटनांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देवून शांतिदूत आहे त्या जागेवरच बसवण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी केली होती. माजी पोलीस अधीक्षक सुरेश खोपडे यांनीही सातारकरांशी चर्चा करुन आंदोलन करण्याचा निर्णय जाहीर केला होता. चार दिवसात शांतिदूतावरुन वातावरण चांगलेच तापले होते. 
पोलीस दलातही नेमकी काय भूमिकाघ्यावी यावर एकमत होत नव्हते. शांतिदूत आहे त्याच ठिकाणी बसवला तर पोलीस दलाने माघार घेतली, असे होईल असे काही अधिकार्‍यांचे मत होते. मात्र पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी लोकभावनेचा आदर करण्याचा निर्णय घेवून या विषयावर पडदा टाकला आहे.
पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी पोलीस अधीक्षकांच्या निर्णयाची प्रत व्हॉट्सअ‍ॅपवरुन प्रसिध्द केली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, पोलीस मुख्यालयाच्या  सुशोभिकरण कामामध्ये बरीच कामे करण्यात आली असून त्याचाच भाग म्हणून व वाहतुकीस अडथळा होत असल्यामुळे पोलीस मुख्यालयाच्या समोरील शांतिदूत
हलवण्यात आला होता. सातारकर जनतेच्या लोकभावनेचा आदर करुन शांततेचे प्रतीक शांतिदूत पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर होता त्याच जागेवर पुनर्स्थापित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर पोलीस मुख्यालय इमारतीच्या सुशोभिकरणाचे कामकाज देखील चालू ठेवण्यात येणार आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: