Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  अग्रलेख  >>  बातम्या

हल्ल्यांचे सत्र
vasudeo kulkarni
Tuesday, February 13, 2018 AT 11:09 AM (IST)
Tags: ag1
पाकिस्तानच्या हद्दीतून होणारी घुसखोरी, दहशतवादी हल्ल्यांना-हिंसाचारी कारवायांना चोख प्रत्युत्तर द्यायच्या केंद्र सरकारच्या जरबेच्या भाषेला, जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यांचे नवे सत्र सुरू करून, पाकिस्तानने केंद्रीय सुरक्षा  दलांना आणि लष्करालाच आव्हान दिले आहे. गेल्याच आठवड्यात श्रीनगरमधल्या रुग्णालयावर सशस्त्र हल्ला करून, पाकिस्तानी हल्लेखोरांनी दोन दहशतवाद्यांना पळवून नेल्याची घटना घडली होती. त्या पाठोपाठ जम्मू येथील सुंजवा लष्करी तळावर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी शनिवारी पहाटे चढवलेल्या सशस्त्र हल्ल्याने, पुन्हा एकदा या राज्यातल्या सरकारला आणि सुरक्षा दलांनाही जोरदार हल्ला बसला. संसदेवर हल्ला चढवलेल्या कटाचा सूत्रधार अफजल गुरू आणि दहशतवादी  बट्ट या दोघांना फाशी दिल्याच्या तारखेलाच काश्मीरमध्ये दहशतवादी स्फोट घडवतील, हल्ला चढवतील, असा इशारा गुप्तचर खात्याने दिला होता. पण, पुन्हा एकदा भारतीय लष्कर, पोलीस आणि गुप्तचर  यंत्रणातल्या उणिवांची संधी साधत पाच दहशतवाद्यांनी सुंजवाच्या लष्करी तळाच्या परिसरातल्या जवानांच्या निवासी इमारतीवरच हल्ला चढवला. सुरक्षा दल आणि लष्करी जवानांची कुटुंबे या इमारतीत राहात असल्याने, तेथे राहणार्‍या सार्‍यांची सुरक्षित सुटका करून दहशतवाद्यांचा खात्मा करायचे आव्हान लष्करासमोर होते. सलग 30 तासांच्या या चकमकीत, लष्कराने या चारही दहशतवाद्यांचे मुडदे पाडण्यात यश मिळवले असले, तरी त्याची फार मोठी किंमत लष्कराला मोजावी लागली. या चकमकीत पाच जवान शहीद झाले, तर एका नागरिकाचाही बळी गेला. नऊ लोक गोळीबारात जखमी झाले. सीमा सुरक्षा दलांच्या चौक्या, गस्तीपथके आणि कडक सुरक्षा व्यवस्था भेदून हे सशस्त्र दहशतवादी सुंजवाच्या लष्करी तळापर्यंत पोचू शकले, हेच गुप्तचर यंत्रणांचे अपयश होय. सुंजवाच्या लष्करी तळावर हल्ला चढवून सामूहिक हत्याकांड आणि प्रचंड हिंसाचार घडवायचे दहशतवाद्यांचे मनसुबे,  मोडून काढण्यात      लष्कराला यश आले असले, तरी  अवघ्या 24 तासाच्या आत श्रीनगरच्या करणनगर विभागातील लष्करी तळावर हल्ल्याचा कट उधळून लावण्यात आला. करणनगरच्या या तळावर हल्ला चढवायसाठी प्रचंड दारूगोळा आणि शस्त्रांनिशी आलेल्या दोन दहशतवाद्यांवर सुरक्षा रक्षकाने तातडीने गोळीबार करताच हे हल्लेखोर पळून गेल्याने, मोठी हानी टळली. सुंजवाच्या  लष्करी तळावर हल्ला चढवलेले पाकिस्तानी दहशतवादी लष्करी जवानांच्या गणवेशात होते आणि त्यांच्याजवळ हातबाँब, उखळी तोफाही होत्या. प्रचंड दारूगोळ्यासह या दहशतवाद्यांनी थेट शिबिरापर्यंत धडक मारली होती. ‘जैश ए मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेनेच या हिंसक कारवाया घडवल्या असाव्यात, असा अंदाज आहे.  लष्करी तळावरच्या जवानांच्या कुटुंबीयांच्या रहिवासी क्षेत्रात दहशतवादी घुसल्याने, परिस्थिती अधिकच चिंताजनक झाली होती.                                                      

आयएसआयच्याच कारवाया
कारगिलमध्ये पाकिस्तानशी युद्ध झाले, ते भारतीय सीमेत पाकिस्तानी लष्कर आणि दहशतवादी घुसल्याची माहिती भारतीय लष्कराला मिळाली नसल्यानेच!  त्या अघोषित युद्धात भारतीय लष्कराला विजय मिळाल्याने सूडाच्या भावनेने पेटलेल्या पाकिस्तानी लष्कराने काश्मीर खोर्‍यात मोठ्या संख्येने दहशतवादी घुसवले.  निरपराध्यांची सामूहिक हत्याकांडे घडवली. काश्मीर खोरे पुन्हा अशांत केले. लष्कर आणि सुरक्षा दलाच्या  जवानांवर,  पोलिसांवर दगडफेक करणार्‍या काश्मिरी युवकांच्या टोळ्यांना पाकिस्तानकडूनच शेकडे कोटी रुपयांचा पुरवठा झाल्याचेही राष्ट्रीय  तपास यंत्रणेने केलेल्या चौकशीत निष्पन्न झाले. काश्मीर खोर्‍यात गस्त घालणार्‍या जवानांवर तुफानी दगडफेक करायची आणि सीमेवर शस्त्रसंधी मोडून दहशतवादी खोर्‍यात घुसवायचे असा आय. एस. आय. या गुप्तहेर संघटनेचा कुटील डाव असल्याचेही उघड झाले. पण, या गुप्तहेर संघटनेची  कटकारस्थाने मोडून काढण्यात भारतीय गुप्तचर यंत्रणांना अद्यापही यश आले नसल्याने, आय. एस. आय. च्या कारवायांना अधिकच चेव आला. पठाणकोटच्या लष्करी हवाई तळावर दहशतवाद्यांनी केलेल्या हिंसक हल्ल्यानंतरही,  हे हल्ले सुरूच राहिले. उरीच्या लष्करी तळावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा प्रतिशोध भारतीय लष्कराने पाकिस्तानी सीमेत घुसून  केलेल्या लक्ष्यवेधी कारवाईने घेतला गेला, पण त्या धडक कारवाईने पाकिस्तानी लष्कर आणि आय. एस. आय.च्या चिथावणीखोर कटकारस्थानात काहीही बदल झालेला नाही आणि होण्याची शक्यताही नाही. काहीही झाले, तरी पाकिस्तान आणि आय. एस. आय. काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना घुसवायची कुटील कारस्थाने बंद करणार नाही. अमेरिकेने पाकिस्तानची कोट्यवधी डॉलर्सची आर्थिक मदत रोखल्यामुळे पिसाळलेल्या आय. एस. आय. ने नव्या जोमाने काश्मीर खोर्‍यात हिंचाचारी कारवाया सुरू केल्या आहेत. पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधले दहशत-वाद्यांचे तळही बंद केलेले नाहीत. त्या भागातल्या जनतेने त्या दहशतवाद्यांच्या विरोधात धाडसाने बंद पुकारूनही काही उपयोग झालेला नाही. काही झाले, तरी पाकिस्तानच्या भारतविरोधी  धोरणात  बदल तर होणार नाहीच. पण अधिकच आक्रमकपणे पुन्हा  एकदा हिंसाचारी कारवायांचा, सामूहिक हत्याकांडांचा वणवा काश्मीर खोर्‍यात धडाडून पेटवायचा आयएसआयचा इरादा असल्याचेच, गेल्या आठवडाभरात  झालेल्या हिंसक-भीषण हल्यांनी उघड झाले आहे. आता पाकिस्तानला निषेध खलिते, कडक निषेध खलिते, इशारा या असल्या धमक्या आणि दरडावणीची भाषा वापरायचा उद्योग केंद्र सरकारने बंद करून, पाकिस्तानी हद्दीत घुसून पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधले दहशतवाद्यांचे सर्व तळ पूर्णपणे उध्वस्त करायला हवेत, गुजरात, राजस्थान, पंजाब आणि जम्मू काश्मीरच्या 740 किलोमीटर आंतरराष्ट्रीय सरहद्द ओलांडून पाकिस्तानच्या चौक्या आणि बंकर नष्ट केल्याशिवाय, पाकिस्तानची खुमखुमी जिरणार नाही. पाकिस्तानला युद्धच हवे असेल तर ते टाळण्यातही काही अर्थ नाही. पाकिस्तानला युद्धाचीच भाषा कळत असेल तर त्याचीही तयारी करायलाच हवी.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: