भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांना अटक
ऐक्य समूह
Tuesday, April 10, 2018 AT 11:20 AM (IST)
5नगर, दि. 9 (वृत्तसंस्था) : शिवसेनेच्या दोन पदाधिकार्यांच्या हत्येनंतर पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयाची तोडफोड केल्या प्रकरणी भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांना अटक करण्यात आली आहे. कर्डिले यांचे जावई आमदार संग्राम जगताप यांची पोलिसांच्या ताब्यातून सुटका करण्यासाठी पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयाची तोडफोड केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. कर्डिले यांची अटक केवळ तोडफोड प्रकरणाशी संबंधित असून त्याचा हत्येशी संबंध नसल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
केडगाव येथे शिवसेनेच्या दोन पदाधिकार्यांची हत्या झाल्यानंतर आ. शिवाजी कर्डिले, माजी आमदार दादाभाऊ कळमकर आणि माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्यासह 250 ते 300 कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाची तोडफोड केली होती. त्यामुळे केडगाव पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात भादंवि कलम 353, 333, 143, 147, 148, 149, 452, 427, 323, 504 आणि सार्वजनिक विद्रुपीकरण कलम 3 व 7 सह सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायदा कलम 3 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यातील 22 जणांना काल अटक करण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणी आज आ. शिवाजी कर्डिले यांना अटक केली. इतर फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
यापूर्वी अशोक लांडे खून प्रकरणात जावई संदीप कोतकर यांना वाचवताना आ. कर्डिले अडकले होते. कोतकर यांना वाचवण्यासाठी कर्डिले यांनी तडजोड केल्याचा आरोप होता. मात्र, सबळ पुराव्याअभावी न्यायालयाने कर्डिले यांची निर्दोष मुक्तता केली होती. या प्रकरणी कोतकर पिता-पुत्रांना मात्र जन्मठेप झाली होती. राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप हे कर्डिले यांचे दुसरे जावई आहेत.