Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
उसने दिलेले पैसे मागितल्याच्या कारणावरून एकावर कुर्‍हाडीने वार
ऐक्य समूह
Tuesday, April 17, 2018 AT 11:14 AM (IST)
Tags: re1
खेड (नांदगिरी) येथील घटना, संशयिताला अटक
5सातारारोड, दि. 16 :   खेड (नांदगिरी), ता. कोरेगाव येथे उसने दिलेले पैसे परत मागितल्याच्या कारणावरून सागर संपत मोरे यास आकाश अविनाश मोरे, अविनाश भैरू मोरे, विश्‍वास भैरू मोरे या तिघांनी रविवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास कुर्‍हाड व लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्यामध्ये सागर मोरे हे गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी तिघांना अटक केली आहे
याबाबत अधिक माहिती अशी, खेड (नांदगिरी) येथील सागर मोरे याने गवंडी काम करत असलेले गावातीलच आकाश मोरे यास काही महिन्यांपूर्वी 2100 रुपये उसणे दिले होते. वारंवार पैशाची मागणी केल्यानंतर आकाशने थोडे थोडे पैसे सागरला दिले होते. उरलेले 600 रुपये देण्यावरून दोघांच्यात सतत वादावादी होत होती. दि.14 रोजी पुन्हा दोघांमध्ये यावरून भांडणे सुरू झाली होती. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी गावात भांडणे नको म्हणून गावकर्‍यांनी   भांडणे मिटवली होती. पुन्हा दि.15 रोजी रात्री सव्वा दहाच्या सुमारास एक जणाला बरोबर घेऊन सागर हा आकाशच्या घराकडे गेला व त्याला बाहेर बोलावून उसणे घेतलेल्या पैशाची त्याने मागणी केली. त्यावर चिडून जाऊन आकाश अविनाश मोरे, अविनाश भैरू मोरे व विश्‍वास भैरू मोरे यांनी घरातून कुर्‍हाड व लाकडी दांडकी आणून सागर मोरे यास जबर मारहाण केली. सागरच्या छातीवर व पोटावर कुर्‍हाडीचे वार करण्यात आले आहेत. कोरेगाव येथील खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची फिर्याद सागर मोरे याचे चुलते प्रल्हाद मोरे यांनी सातारारोड पोलीस दूरक्षेत्रात दिली असून पोलिसांनी तिघांनाही रात्री 2 वाजता रहात्या घरातून अटक केली आहे. दि.16 रोजी कोरेगाव येथील न्यायालयात हजर केले असता आकाश अविनाश मोरे, अविनाश भैरू मोरे व विश्‍वास भैरू मोरे यांना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सातारारोड पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक डी. डी. चौगुले तपास करत आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: