Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
सातारा पालिकेची आजपासून अतिक्रमण हटाव मोहीम
ऐक्य समूह
Tuesday, April 17, 2018 AT 11:18 AM (IST)
Tags: lo1
5सातारा, दि. 16 : पालकमंत्र्यांच्या आदेशामुळे अखेर सातारा पालिका प्रशासनाने पोवई नाक्याला येवून मिळणार्‍या आठही रस्त्यावरील सर्व अतिक्रमणे हटवण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारपासून अतिक्रमण हटाव मोहीम सुरु होणार असून तसे आदेश अतिक्रमण विभागाला मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी सोमवारी दिले. दरम्यान, वाहतूक पोलिसांनीही वाहतुकीला अडथळा ठरणारी अतिक्रमणे काढून घ्यावीत यासाठी सोमवारी जनजागृती केली आणि अतिक्रमण करणार्‍यांना सूचनाही दिल्या आहेत.
पोवई नाक्यावर ग्रेड सेपरेटरचे काम सुरु झाल्यानंतर पोवई नाका आणि परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली आहे. पोवई नाक्याच्या दिशेने येणार्‍या रस्त्यावरभर दुपारी वाहतूक कोंडी होताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठा संताप आहे. वाहतूक कोंडी फोडण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी नागरिकांची मागणी आहे. काही नागरिक पालकमंत्री ना. विजय शिवतारे यांना भेटले आणि त्यांनी अतिक्रमणे काढण्यासाठी पालिकेला आदेश द्यावेत, अशी मागणी केली. त्यावर ना. शिवतारे यांनी मुख्याधिकार्‍यांची खरडपट्टी काढून अतिक्रमण हटाव मोहीम तातडीने राबवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सोमवारपासून अतिक्रमण हटाव मोहीम सुरु होईल, अशी अपेक्षा होती. मात्र ही अपेक्षा फोल ठरली. मात्र सोमवारी मुख्याधिकार्‍यांनी वाहतूक कोंडी होवू नये यासाठी वाहतुकीला अडथळा ठरतील अशी सर्व अतिक्रमणे हटवण्याचे आदेश अतिक्रमण विभागाला दिले आहेत. त्यामुळे मंगळवारपासून वाहतूक कोंडी टळेल, अशी अपेक्षा आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: