Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
खूशखबर! देशात यंदा समाधानकारक पाऊस
ऐक्य समूह
Tuesday, April 17, 2018 AT 11:09 AM (IST)
Tags: mn1
स्कायमेटनंतर हवामान विभागाचाही अंदाज
5नवी दिल्ली, दि. 16 (वृत्तसंस्था) : देशातील कृषिक्षेत्राला आणि बळीराजाला दिलासा देणारा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. मागील दोन वर्षांप्रमाणे यंदाही मान्सून समाधानकारक होणार असल्याचा प्राथमिक अंदाज हवामान खात्याने वर्तवला असून सरासरीच्या 97 टक्के पाऊस होईल, असे हवामान खात्याचे महासंचालक के. जे. रमेश यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. देशावर यंदा दुष्काळाचे सावट नसल्याची शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली आहे. या आधी स्कायमेट या खाजगी हवामान संस्थेनेही समाधानकारक मान्सूनचा अंदाज व्यक्त केला होता.
दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत यंदा जून ते सप्टेंबर या कालावधीत होणारा मान्सून 97 टक्के राहील. त्यात पाच टक्के त्रुटी राहू शकते, असे के. जे. रमेश यांनी सांगितले. नैऋत्य मोसमी पाऊस दरवर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत होतो. या पावसाविषयीचा प्राथमिक अंदाज दरवर्षी एप्रिलमध्ये भारतीय हवामान विभागाकडून जाहीर करण्यात येतो. पावसाचा अंदाज हवामान विभागाकडे असलेल्या गेल्या 50 वर्षांतील नोंदींच्या आधारे काढला जातो. त्यानुसार 89 सेंमी पाऊस हा सरासरी म्हणून ग्राह्य धरला जातो. सरासरीच्या 96 ते 104 टक्के पाऊस हा सर्वसाधारणपणे समाधानकारक म्हणून गणला जातो. त्यामुळेच यंदा हवामान विभागाने सांगितलेला 97 टक्के पावसाचा प्राथमिक अंदाज म्हणजे देशभर चांगला पाऊस होणार असल्याचे संकेत आहेत. यानंतर मे महिन्यात आणखी अंदाज वर्तविण्यात येईल. त्याच वेळी मान्सूनच्या आगमनाची तारीखही हवामान विभागाकडून जाहीर होईल. प्रत्यक्ष पावसाला सुरुवात झाल्यानंतर जूनमध्ये अंतिम अंदाज हवामान विभागाकडून जाहीर करण्यात येतो. यंदा समाधानकारक पावसाचा अंदाज वर्तवितानाच सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता 14 टक्के तर सर्वसाधारण पावसापेक्षा कमी पावसाची शक्यता 30 टक्के आहे. सरासरीइतक्या पावसाची शक्यता 42 टक्के, सरासरीपेक्षा पावसाची शक्यता 12 टक्के तर अतिवृष्टीची शक्यता दोन टक्केच आहे, असे रमेश यांनी सांगितले. 
‘ला निना’चा प्रभाव ओसरत असल्याने त्याचा मान्सूनवर परिणाम होणार नाही, असे हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डी. एस. पै यांनी सांगितले. हवामान विभागाने गेल्या वर्षी 96 मि.मी. पावसाचा अंदाज वर्तवला होता. त्याप्रमाणे 95 टक्के पाऊस पडला होता.
अलीकडेच स्कायमेट या खासगी हवामान संस्थेनेही यावर्षी चांगला पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त केला होता. यंदा सरासरीच्या 100 टक्के पाऊस पडेल. महाराष्ट्रातही उत्तम पाऊसमान असेल, असे स्कायमेटने म्हटले आहे. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक या शहरांमध्ये सामान्य तर मराठवाड्यातही चांगला पाऊस पडेल. येत्या जून महिन्यात सर्वाधिक 111 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे. जुलैमध्ये 97 टक्के तर ऑगस्टमध्ये तुलनेने कमी म्हणजे 96 टक्के पाऊस पडेल. सप्टेंबरमध्ये 101 टक्के पाऊस पडेल, असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: