Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
स्वामी असीमानंदसह पाच आरोपी निर्दोष
ऐक्य समूह
Tuesday, April 17, 2018 AT 11:11 AM (IST)
Tags: mn2
हैद्राबाद मक्का मशीद बाँबस्फोट प्रकरण
5हैद्राबाद, दि. 16 (वृत्तसंस्था) : येथील ऐतिहासिक मक्का मशिदीत 2007 साली झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी नामपल्ली न्यायालय संकुलातील विशेष एनआयए न्यायालयाने स्वामी असीमानंद व अन्य चार आरोपींना सबळ पुराव्याअभावी दोषमुक्त केले. या खटल्याचा निकाल अखेर 11 वर्षांनंतर लागला. दरम्यान, या निकालानंतर राष्ट्रीय तपास संस्थेच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश रवींद्र रेड्डी यांनी आपला राजीनामा आंध्र प्रदेशच्या मुख्य न्यायमूर्तींकडे पाठवला आहे.
हैद्राबाद येथील ऐतिहासिक मक्का मशिदीत 18 मे 2007 रोजी नमाज सुरू असताना बॉम्बस्फोट झाला होता. या स्फोटांमध्ये 9 जण ठार तर 58 जण जखमी झाले होते. स्फोटानंतर आंदोलन करणार्‍या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आणखी 5 जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात एकूण 160 साक्षीदार होते.
हैद्राबाद बॉम्बस्फोटांमध्ये अभिनव भारत या संघटनेशी संबंधित दहा आरोपी होते. या गुन्ह्यात पोलिसांनी नबाकुमार सरकार ऊर्फ स्वामी असीमानंद उर्फ रामदास, देवेंद्र गुप्ता उर्फ बॉबी उर्फ रमेश, लोकेश शर्मा उर्फ अजय तिवारी उर्फ कालू, भरत मोहनलाल रतेश्‍वर उर्फ भरतभाई आणि राजेंद्र चौधरी उर्फ समुंदर उर्फ दशरथ उर्फ लक्ष्मणदास महाराज यांना अटक केली होती.   
यातील स्वामी असीमानंद यांना गेल्या वर्षी 23 मार्च रोजी जामीन मंजूर करण्यात आला होता. भरतभाई याचीही जामिनावर सुटका झाली होती तर उर्वरित तीन आरोपी हैद्राबादमधील कारागृहात आहेत. यातील दोन प्रमुख आरोपी रामचंद्र कलसांगरा आणि संदीप डांगे हे अजून फरार आहेत तर सुनील जोशीचा गोळ्या घालून खून करण्यात आला होता. त्याचा मृतदेह मध्य प्रदेशातील देवास येथे आढळला होता. तेजराम परमार व अमित चौहान यांच्याविरोधात अजूनही तपास सुरु आहे.
या बॉम्बस्फोट प्रकरणी हैद्राबादमधील हुसैनी आलम पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणांचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. सीबीआयने 68 प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवले होते. त्यातील 54 साक्षीदारांनी जबाब फिरवले होते. सीबीआयने या प्रकरणी आरोपपत्र दाखल केले होते. त्यानंतर एप्रिल 2011 मध्ये या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपवण्यात आला होता. या प्रकरणी हैद्राबाद येथील नामपल्ली संकुलातील विशेष एनआयए न्यायालयात एनआयएने 16 मे 2011 रोजी पहिले तर 16 जुलै 2012 रोजी पुरवणी आरोपपत्र दाखल केले होते. यातील सात जणांवर एनआयएने कट रचणे, बॉम्बस्फोट करणे आणि भादंवि कलम 302 (खून करणे), 307 (खुनाचा प्रयत्न), 326, 324, 120 (ब), विघातक कृत्ये प्रतिबंधक कायदा 1967 आणि स्फोटके कायद्यातील कलमांन्वये आरोप ठेवले होते. एनआयएच्या आरोपपत्रात दोन आरोपी फरार असल्याचे दाखवण्यात आले होते.
न्यायाधीशांचा राजीनामा
दरम्यान, या खटल्यातील पाचही आरोपींना दोषमुक्त करणारे विशेष एनआयए न्यायालयाचे न्यायाधीश रवींद्र रेड्डी यांनी हैद्राबादच्या मुख्य न्यायदंडाधिकार्‍यांकडे आणि आंध्र प्रदेशच्या मुख्य न्यायमूर्तींकडे आपला राजीनामा सोपवला. रेड्डी यांनी वैयक्तिक कारणांसाठी राजीनामा  दिला आहे. त्याचा आजच्या निकालाशी काहीही संबंध नाही. रेड्डी यांनी या राजीनाम्याचा निर्णय आधीच घेतला होता, असे न्यायालयातील एका वरिष्ठ अधिकार्‍याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: