Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पीडितेचे कुटुंबीय व वकिलांना संरक्षण देण्याचे निर्देश
ऐक्य समूह
Tuesday, April 17, 2018 AT 11:12 AM (IST)
Tags: na1
कठुआ बलात्कार खटला चंदीगडला हलवण्याची मागणी
5नवी दिल्ली, दि. 16 (वृत्तसंस्था) : जम्मू-काश्मीरमधील कठुआ येथे 8 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवरील पाशवी बलात्कार आणि अमानुष हत्या प्रकरणाचा खटला चंदीगड येथील न्यायालयात हलविण्याच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने जम्मू-काश्मीर सरकारकडून 28 एप्रिलपर्यंत उत्तर मागवले आहे. पीडितेचे कुटुंबीय व त्यांच्या वकिलांना सुरक्षा पुरवण्याचे निर्देशही न्यायालयाने सोमवारी दिले.
कठुआ बलात्कार प्रकरणाची स्वत:हून दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची तपासणी करण्याचा निर्णय घेतला होता. हा खटला जम्मू-काश्मीर बाहेर चालवावा आणि पीडितेच्या कुटुंबीयांना सुरक्षा देण्याची मागणी करणारी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली होती. पीडितेच्या कुटुंबीयांच्यावतीने बाजू मांडणार्‍या वकील दीपीकासिंह राजावत यांनी ही याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली असता दीपीकासिंह यांनी स्वतःच्या व पीडितेच्या कुटुंबीयांच्या जीविताला धोका असल्याचे न्यायालयाला सांगितले. त्यावर पीडितेचे कुटुंबीय, वकील दीपिकासिंह आणि कुटुंबीयांचे स्नेही तालिब हुसेन यांना पुरेशी सुरक्षा व्यवस्था पुरवण्याचे निर्देश सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्या. धनंजय चंद्रचूड व न्या. ए. एम. खानविलकर यांच्या खंडपीठाने दिले.      
त्याचबरोबर या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला ठेवण्यात आलेल्या निरीक्षण गृहाभोवतीही चोख बंदोबस्त ठेवण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. या प्रकरणी सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी आरोपींच्या कुटुंबीयांनी केली होती. या मागणीला पीडितेच्या कुटुंबीयांनी विरोध करताना जम्मू-काश्मीर पोलिसांच्या तपासावर समाधान व्यक्त केले. त्यावर, सद्य स्थितीत सीबीआयकडे तपास सोपवावा की नाही, असे न्यायालयाने सांगितले. दरम्यान, या बलात्कार व खून प्रकरणी कठुआ येथील जिल्हा व सत्र न्यायालयात आजपासून सुनावणी सुरू झाली. यावेळी आठपैकी सात आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले होते. या सर्वांनी आपण निर्दोष असल्याचा दावा करताना आपली नार्को चाचणी करण्याची मागणी केली. त्यावर न्यायाधीश संजय गुप्ता यांनी काहीही प्रतिक्रिया दिली नाही. आरोपींना आरोपपत्रांच्या प्रती देण्याचे निर्देश जम्मू-काश्मीर पोलिसांना दिल्यानंतर गुप्ता यांनी पुढील सुनावणी 28 एप्रिलपर्यंत पुढे ढकलली आजची सुनावणी थोडाच वेळ झाली. त्यानंतर आरोपींना कडेकोट बंदोबस्तात तातडीने तुरुंगात नेण्यात आले.
माझ्या जीवाला धोका
दरम्यान, या खटल्यात पीडितेच्या कुटुंबीयांची बाजू मांडणार्‍या वकील दीपिकासिंह राजवंत यांनी स्वत:च्या व पीडितेच्या कुटुंबीयांच्या जीविताला धोका असल्याची भीती न्यायालयात व्यक्त केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना, माझ्या जीवाला धोका असून बलात्कारसुद्धा केला जाऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.
आठ वर्षांच्या पीडितेला न्याय मिळावा यासाठी मी लढाई लढत आहे. मात्र, त्यांचे वकीलपत्र घेतल्यापासून मला सर्वांनी वाळीत टाकले आहे. या लढाईत मी किती दिवस टिकेन हे माहीत नाही. माझ्याबाबत काहीही होऊ शकते. माझ्यावर बलात्कार होऊ शकतो. माझी हत्या केली जाऊ शकते किंवा माझी प्रॅक्टिस थांबवली जाऊ शकते. सध्या मी भयंकर परिस्थितीतून जात असून मला व माझ्या कुटुंबाला सुरक्षा देण्यात यावी, अशी विनंती सर्वोच्च न्यायालयाला केल्याचेही त्या म्हणाल्या.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: