Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पाटण, मसूर भागाला वादळी पावसाने झोडपले
ऐक्य समूह
Tuesday, April 17, 2018 AT 11:17 AM (IST)
Tags: re2
5पाटण, दि. 16 : पाटणसह तालुक्यातील कोयना, नवारस्ता, मल्हारपेठ, चाफळ, मणदुरे, मोरगिरी परिसराला सोमवारी दुपारी वळीवाच्या व गारांच्या पावसाने दोन तास चांगलेच झोडपून काढले.
दरम्यान, मसूर, कांबीरवाडी परिसरात सोमवारी दुपारी वादळी वार्‍यासह झालेल्या पावसाने ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली. बहरात आलेल्या आंब्यांचा खच पडून नुकसान झाले. सुमारे दोन तास सुरू असलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले.
सोमवार हा पाटणचा आठवडा बाजार असल्याने अचानक वादळी वार्‍यासह आलेल्या पावसाने भाजीपाला विक्रीसाठी आलेल्या व्यापारी व नागरिकांची तारांबळ उडाली. वार्‍यामुळे अनेक छोट्या व्यापार्‍यांची दुकानाची पाले उडून गेल्याने त्यांचे हजारो रुपयांचे शेतीमालाचे नुकसान झाले आहे. तर आंबा बागायतदार आणि वीट भट्टी मालकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच अडूळ गावठाण येथील शिवाजी रामचंद्र शिर्के यांच्या घरावरील पत्र्याचे छत उडून गेले. या पावसामुळे हवेत चांगलाच गारवा निर्माण झाला होता.
दरम्यान, प्रचंड वार्‍यामुळे कराड-चिपळूण राज्य मार्गावरील अडूळ येथे झाड पडल्याने काही काळ   वाहतूक खोळंबली होती. विद्युत वाहिनीवर झाडाच्या फांद्या पडल्याने सायंकाळी उशिरापर्यंत वीजपुरवठा बंद होता. पाटण तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून प्रचंड उष्मा वाढला असून उन्हाच्या तीव्रतेमुळे अंगाची लाही लाही होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून तर दिवसभर आकाश ढगाळलेले राहत आहे. नागरिक प्रचंड उकाड्याने हैराण झाले असतानाच सोमवारी दुपारी तीनच्या दरम्यान पावसाने जोरदार हजेरी लावली. नवारस्ता परिसरात गारांच्या वर्षावाने या पावसाला सुरूवात झाल्याने बालगोपाळांसह नागरिकांनी  गारा गोळा करण्याचा आनंद घेतला. तर पाटणसह परिसरात वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस झाला. मात्र अचानक सुरू झालेल्या या पावसांमुळे नागरिक आणि व्यापारी वर्गाची तारांबळ उडाली. या पावसामुळे रस्त्यावर सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. सोमवारी पाटणचा आठवडा बाजार असल्याने पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती. तर अनेक शेतकर्‍यांचा माल पाण्यातून वाहून गेला. दोन तास पडणार्‍या पावसामुळे दुपारी 4 वाजताच शेतकरी घरी निघून गेले. पडलेल्या दमदार पावसामुळे प्रचंड उन्हामुळे हैराण झालेल्या नागरिकांना मात्र दिलासा मिळाला आणि हवेत थोडासा गारवा निर्माण झाला. तर सलग दोन तास पडणार्‍या पावसामुळे बागायतदार शेतकरी आणि वीट भट्टी मालकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. काही इमारतीवरच्या प्लास्टिकच्या पाण्याच्या टाक्या कोसळल्या. या पावसामुळे जीवित हानी झाली नसली तरी वित्तहानी मोठी झाली आहे.
विविध पिकांना जीवदान
पाटणसह परिसरात झालेला पाऊस उन्हाळी हंगामातील ऊस, भुईमूग, मका पिकाला जीवदान मिळाले. मात्र आंबा पिकाचे नुकसान झाले असल्याची माहिती शेतकरी राजेंद्र सावंत यांनी दिली.
मसूर परिसराला वादळी पावसाचा तडाखा
मसूर : मसूर, कांबीरवाडी परिसरात सोमवारी दुपारी वादळी वार्‍यासह झालेल्या पावसाने ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली. बहरात आलेल्या आंब्यांचा खच पडून नुकसान झाले. सुमारे दोन तास सुरू असलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. परिसरात दुपारी ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट आणि वादळी वार्‍यासह पावसास सुरुवात झाली. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. विजेच्या आवाजाने  प्रवासी निवारा पाहून भयभीत होऊन पाऊस उघडण्याची वाट पहात होते. उसाने भरलेल्या बैलगाड्या रस्त्यावर उभ्या करून गाडीवानांना आसरा शोधावा लागला. वार्‍याचा वेग एवढा होता की, घरांवरील पत्रे उडून जातात की काय, असे उचलून आपटत होते.
मसूर-उंब्रज रस्त्यावर संघाच्या पेट्रोल पंपाशेजारी झाड पडल्याने सुमारे दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. पावसाने शेतात पाणी साचले होते. मसूर येथील मुख्य चौकातील खड्डे पावसाच्या पाण्याने भरल्याने तेथे तळ्याचे स्वरूप आले होते. आता तरी या खड्ड्यांकडे कोणी लक्ष देईल का, असा सवाल ग्रामस्थ करत आहेत. मसूर-उंब्रज मार्गावर गटाराचे पाणी रस्त्यावर आल्याने नागरिकांना या घाणेरड्या पाण्यातून वाट काढावी लागत होती. दोन तास पडलेल्या पावसाने वीजपुरवठा खंडित झाला होता. सुदैवाने पावसामुळे व वार्‍यामुळे जीवितहानी झाली नाही. तालुक्यात नांदगावपासून पश्‍चिम भाग, येणके, पोतले, घारेवाडी, हेळगाव येथेही वादळी वार्‍यासह हलका पाऊस झाला.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: