Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
‘स्वच्छ भारत’ सर्वेक्षणात पाचगणी पश्‍चिम विभागात अव्वल
ऐक्य समूह
Thursday, May 17, 2018 AT 11:09 AM (IST)
Tags: re1
5पाचगणी, दि. 16 : ‘स्वच्छ भारत’ सर्वेक्षण अभियानात पाचगणी नगरपालिकेने आपल्या स्वच्छतेची मोहोर उमटवली आहे. देशात पश्‍चिम विभागात प्रथम येण्याचा मान पाचगणीने मिळवला आहे.
‘स्वच्छ भारत सर्वेक्षण 2018’ मध्ये सहभागी झालेल्या पाचगणी पालिकेने पहिल्या टप्प्यापासूनच अभियानात आघाडी घेतली होती. सातत्यपूर्ण कामगिरी, नगराध्यक्ष लक्ष्मी कर्‍हाडकर यांचे नेतृत्व, त्यांना मिळालेली नगरसेवकांची साथ, मुख्याधिकारी अमिता दगडे-पाटील यांचे प्रशासकीय नियंत्रण आणि पालिका कर्मचार्‍यांना नागरिक व पर्यटकांनी दिलेली उत्तम साथ यामुळे पाचगणीने देशपातळीवर आपला डंका वाजवला आहे. देशपातळीवर लोकसंख्येनुसार ही स्पर्धा घेण्यात आली होती. यामध्ये एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या सुमारे 4400 पालिकांमधून पश्‍चिम विभागात प्रथम पारितोषिक जाहीर झालेल्या पाचगणी पालिकेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे. केंद्र व राज्य शासनामार्फत पालिकेला कोट्यवधी रुपयांचे पारितोषिक मिळणार आहे. विशेष म्हणजे गुणानुक्रमानुसार पाचगणी पालिकेने देशात सर्वाधिक गुण मिळवले आहेत. स्वच्छता, लोकसहभाग, नवनवीन कल्पना आदी क्षेत्रातील पालिकेच्या उपक्रमांची देशपातळीवर दखल घेतली गेल्याचे समाधान पाचगणीकरांना लाभले आहे. या यशात सौ. लक्ष्मी कर्‍हाडकर, उपनगराध्यक्ष नरेंद्र बिरामणे, माजी उपनगराध्यक्ष विनोद बिरामणे, नगरसेवक प्रवीण बोधे, पृथ्वीराज कासुर्डे, रेखा कांबळे, दिलावर बागवान, अनिल वन्ने, विजय कांबळे, उज्ज्वला महाडिक, सुलभा लोखंडे, नीता कासुर्डे, रेखा जानकर, हेमा गोळे, सौ. आशा बगाडे, अर्पणा कासुर्डे, विठ्ठल बगाडे, सुमन गोळे, मुख्याधिकारी अमिता दगडे-पाटील व कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.
महानायकाच्या हस्ते गौरव
या स्पर्धेत पश्‍चिम विभागात प्रथम आलेली पाचगणी पालिका यापूर्वी स्वच्छता अभियानात देशात पहिली आली होती. त्यावेळी पालिकेला बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरविण्यात आले होते.
पाचगणीत जल्लोष
पाचगणी पालिकेला स्वच्छ सर्वेक्षणामध्ये पारितोषिक जाहीर झाल्याचे समजताच पाचगणीत एकच जल्लोष झाला. छ.शिवाजी चौकात सर्व नगरसेवक गोळा झाले. फटाक्याच्या आतषबाजीत लोकांनी पेढे वाटून हा आंनद व्यक्त केला.
हा पुरस्कार प्रत्येकाचा
सौ. कर्‍हाडकर म्हणाल्या, हा पुरस्कार पालिका क्षेत्रात स्वच्छतेसाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सहकार्य करणार्‍या प्रत्येकाचा आहे. नागरिकांच्या साथीने आम्ही कोणत्याही अभियानात यशस्वी होऊ शकतो, हे या पुरस्कारामुळे आम्ही दाखवून दिले आहे.
 
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: