Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
राज्यपालांचे भाजपला सत्ता स्थापनेचे निमंत्रण
ऐक्य समूह
Thursday, May 17, 2018 AT 11:08 AM (IST)
Tags: mn1
काँग्रेस-धजद सर्वोच्च न्यायालयात जाणार
5बंगलोर, दि. 16 (वृत्तसंस्था) : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत जनतेने त्रिशंकू कौल दिल्यामुळे निर्माण झालेला सत्ता स्थापनेचा पेच आता संपला असून राज्यपाल वजूभाई वाला यांनी भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार बी. एस. येडीयुरप्पा यांना सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रण दिले आहे. बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांनी येडीयुरप्पा यांना 15 दिवसांची मुदत दिली आहे. दरम्यान, काँग्रेस-धर्मनिरपेक्ष जनता दल आघाडीकडे आवश्यक बहुमत असूनही भाजपला निमंत्रित करण्याच्या राज्यपालांच्या निर्णयाला आघाडीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यासाठी खंडपीठ स्थापन करण्याची विनंती सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांना करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.
कर्नाटक विधानसभेच्या 224 पैकी 222 जागांसाठी 12 मे रोजी मतदान झाले होते. काल (दि. 15) जाहीर झालेल्या निकालात भाजपने 104, काँग्रेसने 78 व माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या धर्मनिरपेक्ष जनता दलाने (धजद) 37 तर त्यांचा सहयोगी पक्ष बसपने एका जागेवर विजय मिळवला. त्यामुळे त्रिशंकू स्थिती निर्माण झाली. मात्र, भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने धजदला विनाशर्त पाठिंबा दिला. त्यानंतर मंगळवारी भाजप आणि काँग्रेस-धजद आघाडी यांनी राज्यपाल वजूभाई वाला यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला होता. मात्र, राज्यपालांनी काल कोणताच निर्णय घेतला नव्हता.
या पार्श्‍वभूमीवर आज दिवसभरात जोरदार घडामोडी घडल्या. भाजपने काँगे्रस आणि धजदच्या आमदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला तर आघाडीने आपल्या सर्व आमदारांना एकत्र करून रिसॉर्टवर पाठवण्याचा निर्णय घेतला. भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची आज पुन्हा प्रदीर्घ बैठक होऊन त्यात येडीयुरप्पा यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. दुसर्‍या बाजूला काँग्रेस व धजद यांच्या नवनिर्वाचित आमदारांच्या वेगवेगळ्या बैठका झाल्या. धजदच्या बैठकीत एच. डी. कुमारस्वामी यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली तर काँग्रेसने आपल्या नवनिर्वाचित आमदारांच्या सह्या असलेले पाठिंब्याचे पत्र धजदला दिले.
भाजपचे विधिमंडळ पक्षनेते येडीयुरप्पा, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर व जे. पी. नड्डा यांनी आज पुन्हा राज्यपालांची भेेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला. त्यानंतर काँग्रेस व धजदच्या नेत्यांनी एच. डी. कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखाली राज्यपालांची भेट घेऊन 117 आमदारांच्या सह्या असलेले पत्र दिले. आपल्यालाच सत्ता स्थापनेसाठी निमंत्रित करावे, अशी मागणी करून पाठिंबा असलेल्या सर्व आमदारांची परेड करण्याची तयारी काँग्रेस व धजद नेत्यांनी दर्शवली. मात्र, राज्यपालांनी त्यास नकार दिला असून भाजपच्या येडीयुरप्पा यांना सरकार स्थापन करण्यास निमंत्रित केले आहे. या निर्णयाचा काँग्रेस-धजदने निषेध केला असून सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची याचिका उद्या (गुरुवार) दाखल करण्यात येणार असल्याचे समजते. राज्यपालांनी लोकशाहीचा गळा घोटला असून राज्यघटना पायदळी तुडवली आहे. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप अध्यक्ष अमित शहा यांचे एजंट म्हणून काम करत असल्याचा आरोपही काँग्रेस नेत्यांनी केला आहे.
भाजपवर घोडेबाजाराचा आरोप
दरम्यान, भाजपने आपल्या आमदारांना गळाला प्रत्येकी 100 कोटी रुपये आणि कॅबिनेट मंत्रिपदाची ऑफर दिल्याचा खळबळजनक आरोप धजदचे नेते कुमारस्वामी यांनी केला. मात्र, आमदारांनी भाजपची ऑफर धुडकावून लावल्याचे त्यांनी सांगितले. भाजपने 2008 मध्ये राबवलेले आमदार फोडीचे ‘ऑपरेशन लोटस’ यावेळीही सुरू केल्यास ते महागात पडेल. भाजपने आमचे दहा आमदार फोडले तर आम्ही त्यांचे दुप्पट आमदार फोडू, असा इशाराही त्यांनी दिला.
‘काल्पनिक’ आरोप : जावडेकर
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मात्र कुमारस्वामी यांचे आरोप फेटाळले आहेत. कुमारस्वामी यांचे आरोप काल्पनिक आणि तथ्यहीन आहेत. काँग्रेसच घोडेबाजार करण्यासाठी प्रसिद्ध आहे. धजद-काँग्रेस आघाडीवर त्यांचेच आमदार नाखूश आहेत. आम्ही नीतिमूल्यांचे पालन करत आहोत, असेही जावडेकर यांनी सांगितले. दरम्यान, काँग्रेसने राज्यपाल व पंतप्रधानांवर केलेल्या आरोपांचा केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. काँग्रेसने केंद्रातील आपल्या सत्ता काळात अनेक राज्यांमध्ये विरोधी पक्षांची सरकारे बरखास्त करून तेथे राष्ट्रपती राजवटी लागू केल्याचा इतिहास आहे. मात्र, तेच आज आम्हाला राज्यघटनेचे धडे देत आहेत, अशी टीका प्रसाद यांनी केली.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: