Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
भ्रष्टाचार प्रकरणी वाईच्या नगराध्यक्षांना नगरविकास विभागाची कारणे दाखवा नोटीस
ऐक्य समूह
Thursday, May 17, 2018 AT 11:11 AM (IST)
Tags: re2
5वाई, दि. 16 ः नगराध्यक्षपदावर असताना शौचालयाच्या बांधकामाचे बील काढण्याच्या मोबदल्यात लाचेची मागणी करून ती लाच आपल्या पतीने स्वीकारल्यामुळे आपण व आपल्या पतीच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे. आपणाविरुद्ध अभियोग दाखल करण्यास नुकतीच शासनाने मान्यता दिली आहे. या गैरकृत्याबाबत आपणाविरुद्ध कार्यवाही करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांनी पुणे विभागीय आयुक्तांमार्फत शासनास सादर केला आहे. या गंभीर स्वरूपाच्या गैरवर्तनाबद्दल नगराध्यक्षपदावरून दूर करून पुढील सहा वर्षांच्या कालावधीसाठी पालिका सदस्य होण्यास किंवा कोणत्याही इतर प्राधिकरणाच्या सदस्य होण्यास अनर्ह का करण्यात येऊ नये, अशी कारणे दाखवा नोटीस शासनाच्या नगरविकास विभागाचे कक्ष अधिकारी प्रवीण पाटील यांनी वाईच्या नगराध्यक्ष डॉ. सौ. प्रतिभा शिंदे यांना दिली आहे.
नोटीसमध्ये म्हटले आहे की, आपण वाई नगरपरिषदेच्या अध्यक्ष या महत्वाच्या पदावर कार्यरत असताना शहरातील शौचालयाच्या बांधकामाचे 1 लाख 40 हजार रुपयांचे बिल काढण्याच्या मोबदल्यात अमित रामचंद्र जायगुडे यांच्याकडून 10 टक्क्यांप्रमाणे 14 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. ती लाच आपले पती सुधीर शिंदे यांनी स्वीकारल्यामुळे आपण व आपल्या पतीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल झाला आहे. आपणाविरुद्ध अभियोग दाखल करण्यास 22 मार्च रोजी शासन मान्यता देण्यात आली आहे. आपणाकडून घडलेल्या या गैरकृत्याबाबत अधिनियमातील कलम 55 अ व ब अंतर्गत कार्यवाहीचा प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांनी पुणे विभागीय आयुक्तांमार्फत सादर केला आहे.
उपरोक्त बाब महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 55 (अ) चा भंग करणारी आहे.    
आपले वर्तन पदास अशोभनीय असल्याचे सकृतदर्शनी दिसून येते. या गंभीर स्वरूपाच्या गैरवर्तनाबद्दल महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियमानुसार आपणास वाई नगरपरिषदेच्या अध्यक्षपदावरून दूर करून पुढील सहा वर्षांच्या कालवधीसाठी पालिका सदस्य होण्यास किंवा कोणत्याही इतर स्थानिक प्राधिकरणाचा सदस्य होण्यास अनर्ह का करण्यात येऊ नये, यासाठी ही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येत आहे. ही नोटीस मिळाल्याच्या दिवसापासून पंधरा दिवसांत आपल्या बचावाचा लेखी खुलासा शासनास सादर करावा, असेही नोटिसीत म्हटले आहे. याबाबत डॉ. सौ. शिंदे यांना विचारले असता त्या म्हणाल्या, मला नोटीस मिळाली असून वकिलांशी चर्चा करून मुदतीत लेखी खुलासा करण्यात येईल. दरम्यान, नगराध्यक्षांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याने याची शहरात जोरदार चर्चा सुरू आहे. भ्रष्टाचाराच्या या प्रकरणाकडे अलीकडच्या काळात दुर्लक्ष झाले होते. मात्र, या नोटिसीमुळे प्रकरण पुन्हा चर्चेत आले असून वाई विकास महाआघाडी अडचणीत येण्याची शक्यता आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: