Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
शामगाव घाटात एसटीच्या धडकेत दुचाकीवरील दोन मुली ठार
ऐक्य समूह
Thursday, May 17, 2018 AT 11:13 AM (IST)
Tags: re4
5मसूर, दि. 16 : कराड-वडूज रस्त्यावर शामगाव घाटातील पोलीस चेक नाक्याजवळ बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास एसटीने दुचाकीस धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील कु. भूमी प्रकाश तुपे (वय 12) रा. कोपर्डे हवेली, ता. कराड व संचिता विजय तुपे (वय 10) या दोन मुलींचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
याबाबत माहिती अशी, वडूज डेपोची कराड-वडूज ही बस (एमएच-06-एस-8057) बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास कराडकडून वडूजकडे जात असताना समोरून येणार्‍या स्प्लेंडर दुचाकीला (एमएच-05-एए-4372) शामगाव घाटाच्या पायथ्याशी पोलीस चौकीजवळील वळणावर एसटीच्या मागील भागाची धडक बसल्याने दुचाकीचालक प्रशांत बाळासाहेब थोरात हा बाजूला पडला तर संचिता तुपे व भूमी तुपे यांची डोकी  एसटीच्या मागील भागावर आपटल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. प्रशांत व भूमी यांना उपचारासाठी कराड येथील एरम हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. त्यावेळी भूमी तुपे ही मयत झाल्याचे सांगण्यात आले. संचिता तुपे अत्यवस्थ असल्याने तिला उपचारासाठी कृष्णा हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. मात्र, तिचाही मृत्यू झाला. हे सर्व जण प्रशांत थोरातच्या मावसभावाच्या दि. 19 रोजी होणार्‍या विवाह समारंभास शामगाव, ता. कराड येथे आले होते. देवदर्शनासाठी ते शामगाव येथे गेले होते. तेथून परत येत असताना ही दुर्घटना घडली. या प्रकरणी बसचालकावर गुन्हा दाखल झाला आहे.
अपघाताची माहिती देण्यास पोलिसांची टाळाटाळ
मसूर दूरक्षेत्रात अनेक गुन्हे दाखल होत आहेत. या गुन्ह्यांची माहिती घेण्यासाठी माध्यमांचे प्रतिनिधी गेल्यास त्यांना माहिती देण्यास पोलिसांकडून टाळाटाळ केली जात आहे. माहिती उपलब्ध असतानाही ती जाणूनबुजून दिली जात नाही.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: