Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्यमंत्र्यांची मान्यता; 36 हजार पदे भरणार
ऐक्य समूह
Thursday, May 17, 2018 AT 11:18 AM (IST)
Tags: mn2
राज्य शासनामध्ये मेगा भरती
5मुंबई, दि. 16 (प्रतिनिधी) : ग्रामीण भागात अत्यावश्यक सेवासुविधा पुरविण्यासाठी संबंधित विभागांमधील रिक्त पदांची भरती करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात राज्य शासनातील 36 हजार पदांची भरती करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मान्यता दिली.
या संदर्भात अर्थसंकल्पीय अधिवेशनात झालेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी, राज्याच्या प्रशासनातील विविध विभागांमधील 72 हजार रिक्त पदे दोन टप्प्यात भरण्यात येतील, असे जाहीर केले होते. पहिल्या टप्प्यात यातील 36 हजार पदे भरण्यात येणार असून ही पदे भरताना ग्रामीण भागातील प्रशासकीय यंत्रणेचे सक्षमीकरण करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. विशेषत: कृषी आणि ग्रामविकासाशी संबंधित विविध विभागांमधील रिक्त पदे अग्रक्रमाने भरण्यात येतील. शेतीच्या शाश्‍वत विकासासाठी सरकारने विविध योजना जाहीर केल्या आहेत; परंतु संबंधित विभागांमधील रिक्त पदांमुळे त्यांची अंमलबजावणी करण्यात अडचणी येत आहेत. ग्रामीण भागात पायाभूत आणि जीवनावश्यक सुविधा देण्यातही अडचणी येत होत्या. त्यामुळे कृषी आणि ग्रामविकासाशी संबंधित रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यंदा पहिल्या टप्प्यात भरण्यात येणार्‍या 36 हजार पदांमध्ये ग्रामविकास विभागातील 11 हजार 5,  सार्वजनिक आरोग्य विभागातील 10 हजार 568, गृह विभागातील 7 हजार 111, कृषी विभागातील 2 हजार 572, पशुसंवर्धन विभागातील 1 हजार 47, सार्वजनिक बांधकाम विभागातील 837, जलसंपदा विभागातील 827, जलसंधारण विभागातील 423, मत्स्यव्यवसाय विकास विभागातील 90 आणि नगरविकास विभागातील 1 हजार 664 पदांचा समावेश आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: