Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पेट्रोल, डिझेल दरात पुन्हा किरकोळ कपात
ऐक्य समूह
Tuesday, June 05, 2018 AT 11:27 AM (IST)
Tags: na1
5नवी दिल्ली, दि. 4 (वृत्तसंस्था) : सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल, डिझेलच्या दरात सलग सहाव्या दिवशी सोमवारी पुन्हा एकदा कपात केली आहे. पेट्रोलच्या दरात 15 पैशांची तर डिझेलच्या दरात 14 पैशांची कपात करण्यात आली आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर सलग 16 दिवस या इंधनांच्या दरात अनुक्रमे 3.64 रुपये व 3.24 रुपयांची वाढ झाली होती. त्या तुलनेत या दरकपातीमुळे सर्वसामान्यांना सौम्य दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारातील दरांनुसार पेट्रोल व डिझेलच्या किमती दररोज ठरवण्याचे तेल कंपन्यांचे धोरण यापुढेही सुरू राहील.  या धोरणाचा फेरआढावा घेण्यात येणार नाही, असे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज गुजरातमधील दाहेज येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे मतदान झाल्यानंतर सलग 19 दिवस तेल कंपन्यांनी पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ केली होती. त्यामुळे या इंधनाच्या किमती दररोज नवनवा उच्चांक गाठत होत्या. त्यामुळे केंद्र सरकारवर विरोधकांनी चौफेर टीका केली होती. देशातील सर्वसामान्य जनतेतही सरकारविरुद्ध असंतोष होता. या पार्श्‍वभूमीवर तेल कंपन्यांनी 30 मे रोजी पेट्रोल व डिझेलच्या दरात अवघ्या एका पैशाची कपात केली होती. त्यामुळे राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना ही जनतेची क्रूर थट्टा असल्याचे म्हटले होते. मात्र, त्यानंतर पेट्रोल व डिझेलच्या दरात थोडी थोडी कपात करण्यात आली. सोमवारपर्यंत पेट्रोलच्या दरात 47 पैशांची कपात करण्यात आली आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: