Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
रिंकू ओसवाल खून प्रकरणात पतीला जन्मठेप
vasudeo kulkarni
Thursday, June 07, 2018 AT 11:00 AM (IST)
Tags: lo2
5सातारा, दि. 6 : माहेरहून सोने आणण्याच्या मागणीवरून पत्नी रिंकू उर्फ भाग्यश्री ओसवाल हिचा गळा आवळून खून करणार्‍या भरत कांतीलाल ओसवाल (वय 31, रा. आयटीआय जवळ, गुलमोहोर कॉलनी, सातारा) याला बुधवारी जिल्हा सत्र न्यायाधीश डी.ए.ढोलकिया यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. हा खून खटला खूप गाजला होता. आरोपीवर कारवाई व्हावी यासाठी विविध महिला संघटनांनी आक्रमक भूमिकाघेवून वेळोवेळी मोर्चा काढून आंदोलन केले होते.
याबाबत अधिक माहिती अशी, भरत ओसवाल हा पत्नी रिंकू उर्फ भाग्यश्री व इतर कुटुंबीयांसमवेत राहण्यास होता. विवाहावेळी रिंकू  हिच्या माहेरच्या मंडळींनी कमी दागिने केल्याच्या कारणावरून पती नाराज होता. ठरल्याप्रमाणे उर्वरित आठ तोळे दागिने घेवून येण्याच्या कारणावरून भरत हा रिंकूचा छळ करत होता तसेच विवाहाला सुमारे दोन ते तीन वर्षे झाली तरी मूलबाळ होत नसल्याच्या कारणावरूनही भरत हा रिंकूशी वारंवार वाद घालत होता. त्याबाबतची माहिती रिंकू  यांनी फोनवरून कुटुंबीयांना  दिली होती. भरतकडून मात्र दिवसेंदिवस पत्नी रिंकूला त्रास देण्याच्या प्रमाणात वाढ होत होती. दि. 19 ऑक्टोबर 2014 रोजी रात्री रिंकूला बहिणीचा फोन आला होता. फोनवर बोलत असतानाच भरत तेथे आल्याने रिंकूने पती आल्याचे सांगत आपण सकाळी बोलू, असे म्हणत फोन कट केला. त्यानंतर जेवणखाण करून रिंकू  पतीसह बेडरूममध्ये गेली. या ठिकाणी त्यांच्यात पुन्हा वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर भरत याने रिंकूचा गळा आवळला. गळा आवळल्याने रिंकू  बेशुद्ध पडली. रात्री साडेबाराच्या सुमारास भरत याने रिंकूला त्रास होत असल्याचे सांगून तिला उपचाराची गरज असल्याचे कुटुंबीयांना सांगितले.
भरत व इतर नातेवाइकांनी रिंकूला बेशुद्ध अवस्थेत सातार्‍यातील एका रुग्णालयात दाखल केले. त्या ठिकाणी झालेल्या वैद्यकीय तपासणीअंती रिंकूचा मृत्यू झाला असल्याचे घोषित करण्यात आले. या घटनेची माहिती रिंकूच्या माहेरच्या मंडळींना समजल्यानंतर त्यांनी सातार्‍यात धाव घेतली. रिंकूचा मृत्यू संशयास्पद असल्याचे सांगून तो मृतदेह ताब्यात घेण्यास  नकार दिला. मृतदेह शवविच्छेदनासाठी क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात नेल्यानंतर गळ्यावरील व्रण निदर्शनास आले. रुग्णालयाने याबाबतची माहिती  शाहूपुरी पोलीस ठाण्याला दिली. शाहूपुरीचे तत्कालीन पोलीस निरीक्षक एस.एल. पांढरे हे कर्मचार्‍यांसमवेत त्या ठिकाणी गेले. शवविच्छेदन केल्यानंतर रिंकूचा मृत्यू गळा आवळल्याने झाला असल्याचे सांगण्यात आले. भरत यानेच रिंकूचा गळा दाबून खून केल्याची तक्रार रिंकूची आई चंदा मोहन ओसवाल यांनी शाहूपुरी पोलीस  दिली. पोलीस निरीक्षक पांढरे यांनी गुन्ह्याचा तपास करून दोषारोपपत्र सातारा जिल्हा न्यायालयात सादर केले. या खटल्यादरम्यान वैद्यकीय अधिकारी, मृत रिंकूची आई, काका यांच्यासह 11 जणांची साक्ष झाली. साक्षी व परिस्थितीजन्य पुरावे ग्राह्य धरून न्यायाधीश डी.ए.ढोलकिया यांनी भरत ओसवाल याला जन्मठेप आणि 10 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावला. सरकार पक्षातर्फे  सुरुवातीला विशेष सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. विकास पाटील- शिरगावकर यांची नियुक्ती होती. प्रारंभी त्यांनी खटल्याचे काम पाहिले. त्यानंतर जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. महेश कुलकर्णी यांनी काम पाहिले. प्रॉसिक्युशनचे उपनिरीक्षक पी.के. कबुले, हवालदार सुनील सावंत, अजित शिंदे, शमशुद्दीन शेख, कांचन बेंद्रे, नंदा झांजुर्णे, शाहूपुरीच्या पैरवी अधिकारी शशिकांत भोसले, रिहाना शेख यांनी मदत केली.

 
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: