Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
संभाजी भिडे गुरुजींच्या वक्तव्याचा विपर्यास
ऐक्य समूह
Thursday, June 14, 2018 AT 10:59 AM (IST)
Tags: lo1
5सातारा, दि. 13 : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी नाशिक येथील शिवभक्तांच्या मेळाव्यात बोलताना, आपल्या शेतातील आंबा जोडप्यांनी खाल्ल्यास त्यांना मूल होत नसेल तर मूल होते, असे वक्तव्य केल्याचे चुकीचे वृत्त काही माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले होते. त्या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या काही माध्यमांच्या प्रतिनिधींनी भिडे गुरुजींच्या वक्तव्याचा विपर्यास करून अर्धवट वृत्त प्रसारित केले. हेच विपर्यस्त वृत्त सोशल मीडियामुळे व्हायरल झाले आहे. या चुकीच्या माहितीच्या आधारे दैनिक ऐक्यच्या दि. 13 जूनच्या अंकात पान नं. 4 वर लोलक या सदरात लेख प्रसिद्ध झाला आहे. त्याबद्दल दैनिक ऐक्य व्यवस्थापन दिलगीर आहे.
संभाजी भिडे गुरुजी हे अणुशास्त्रातील एम. एस्सी. असून त्यांना विज्ञानाची पूर्ण माहिती आहे. त्यामुळे त्यांच्याकडून पुत्रप्राप्तीबाबत असे वक्तव्य होणे शक्य नाही. संभाजी भिडे गुरुजींनी महाराष्ट्रातील युवकांमध्ये राष्ट्रभक्तीचे स्फुल्लिंग चेतवले असून छत्रपती शिवराय व छत्रपती संभाजी महाराज हे त्यांचे दैवत आहेत.   
रायगडावर 32 मण सोन्याचे सिंहासन निर्माण करण्याचा विडा भिडे गुरुजींनी उचलला असून त्याच्या पूर्ततेसाठी ते स्वत: आणि शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी जीवाचे रान करत आहेत. छत्रपती शिवरायांसारख्या महापुरुषांच्या विचारांवर चालणार्‍या आणि प्रत्यक्ष कृती करणार्‍या भिडे गुरुजींकडून अशा प्रकारचे वक्तव्य कदापि केले गेले नाही. नाशिक येथील मेळाव्यास उपस्थित असलेल्या काही माध्यम प्रतिनिधींनी त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास करून वृत्त प्रसिद्ध केले. सोशल मीडियावरूनही त्यांचे वक्तव्य काही लोकांनी जाणीवपूर्वक व्हायरल केल्याचे स्पष्ट होत आहे. नाशिक येथील मेळाव्यात भिडे गुरुजींनी असे काही वक्तव्य केलेले नाही.
 
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: