Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
वडूज येथे दुचाकींच्या अपघातात पोलिसासह दोन जण ठार
ऐक्य समूह
Thursday, June 14, 2018 AT 10:57 AM (IST)
Tags: mn1
5वडूज/नीरा, दि.13 : वडूज- पुसेगाव रस्त्यावर वाकेश्‍वर गावच्या हद्दीत मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास दोन दुचाकींमध्ये समोरासमोर धडक होवून झालेल्या भीषण अपघातात दहिवडी पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदारासह एक जण जागीच ठार झाला. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
याबाबत वडूज पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, मंगळवार, दि. 12 रोजी रात्री नऊच्या सुमारास वाकेश्‍वर फाटा वडूज-पुसेगाव रोडवर दहिवडी पोलीस ठाण्यातील हवालदार अजित उत्तम टकले (वय 25, रा. मूळचे पिंपरे खुर्द, ता. पुरंदर) हे त्यांच्या नवीन बजाज प्लॅटिना गाडीवरून डिव्हिजन ऑफिसचे टपाल देण्यासाठी वडूजकडे निघाले असता वडूज बाजूकडून महादेव सुदाम वायदंडे (वय 27, रा. अण्णा भाऊ साठेनगर, खटाव) हा त्याच्या डिलक्स मोटारसायकल (एमएच 13 सीझेड 3416) वरून ट्रिपलसीट येत होता. वाकेश्‍वर फाट्यावर अजित टकले व महादेव वायदंडे यांच्या मोटारसायकलची समोरासमोर जोरदार धडक झाली. त्यात  ते जाग्यावरच ठार झाले तर महादेव वायदंडे याच्या गाडीवरील यशवंत साठे (रा. अक्कलकोट) व प्रतीक दिलीप वायदंडे (रा. खटाव) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सातारा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना समजताच वडूज पोलीस ठाण्याचे निरीक्षक यशवंत शिर्के व कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. वडूज पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली असून यशवंत शिर्के तपास करत आहे.
टकले यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
दरम्यान, हवालदार अजित टकले यांच्यावर बुधवारी सकाळी दहा वाजता त्यांच्या मूळ गावी पिंपरे खुर्द येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी दहिवडीचे पोलीसउपअधीक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील, फौजदार प्रकाश इंगळे, दहिवडी पोलीस स्टेशनचे कर्मचारी, सातारा पोलीस मुख्यालयातील फौजदार पांडे, नीरा पोलीस दूरक्षेत्राचे हवालदार आदिनाथ शिंदे, होमगार्ड बापू बरकडे, सरपंच लता थोपटे, पिंपरे खुर्दचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड उपस्थित होते.
पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे माजी सभापती दत्ताजी चव्हाण, दादा थोपटे, उपसरपंच राजेंद्र थोपटे यांनी अजित टकले यांना श्रद्धांजली वाहिली. हवालदार टकले यांच्या निधनाने पिंपरे खुर्द परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अजित टकले यांच्या पश्‍चात वडील, आजी व एक भाऊ असा परिवार आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: