Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
स्वच्छतेच्या नावाखाली सातारा पालिकेच्या तिजोरीची सफाई
ऐक्य समूह
Thursday, June 14, 2018 AT 11:05 AM (IST)
Tags: lo6
सत्ताधार्‍यांकडून चार महिन्यांत साठ लाखांचा घोळ : आ. शिवेंद्रसिंहराजे
5सातारा, दि. 13 :  सातारा नगरपालिकेत सर्व काही आलबेल सुरू नसून नागरिकाने कररूपाने भरलेल्या पैशाची उधळपट्टी सुरू आहे. नगरसेवक कम ठेकेदार पोसण्याचे काम सुरू आहे. स्वच्छतेच्या नावाखाली प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. स्वच्छतेच्या कामावर गेल्या चार महिन्यात साठ लाख रुपयांचे  अधिकचे वाटप झाले असून यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे. नगरविकास आघाडी आणि आमच्यावर खोटे नाटे भ्रष्टाचाराचे आरोप करून पालिकेची सत्ता हस्तगत करणार्‍या सातारा विकास आघाडीने स्वच्छतेच्या नावाखाली पालिकेच्या तिजोरीची चांगलीच सफाई सुरू केली आहे, असा जोरदार आरोप नगरविकास आघाडीचे अध्यक्ष, आमदार श्रीमंत  शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत केला.
सातारा नगरपालिकेच्या गलथान आणि मनमानी कारभाराच्या विरोधात आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, विरोधी पक्षनेते अशोक मोने, नविआचे पक्षप्रतोद अमोल मोहिते यांनी बुधवारी जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांच्याकडे तक्रार केली आणि नंतर पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, सातारकर नागरिक प्रामाणिकपणे पालिकेकडे कररूपाने पैसे जमा करत आहेत. मात्र साविआ हा पैसा त्यांच्या मालकीचाच असल्यासारखे वागत आहे. साविआला साशा कंपनीला अधिकचे साठ लाख रुपये देवून काय साध्य करायचे आहे. जास्तीचे पैसे देवून ठेकेदार पोसायचे काम सातारा पालिकेकडून सुरू आहे. कचरा उचलण्याची  जबाबदारी दिल्यानंतर सातार्‍यातून कचरा जायला पाहिजे होता. मात्र, रोज कोणत्या ना कोणत्या तरी चौकात, नाक्यावर कचर्‍याचे ढीग दिसत आहेत. साविआने लोकांच्या पैशांवर डल्ला मारण्याचे काम थांबवावे. पालिकेत बहुमत असल्यामुळेच मनमानी कारभार सुरू आहे. सातारा शहरात वृक्षलागवडीसाठी चार कोटी रुपयांचे काम खासगी बीव्हीजी तसेच अन्य काही कंपन्यांना देण्यात आले आहे. मात्र, गेल्या काही दिवसात किती झाडे किती उंच वाढली हे बाळू शिंदे यांनाच विचारावे लागेल. साविआने सातारा शहराची लूट चालवली आहे. कोणते तरी गोंडस नाव ठेवायचे आणि त्यातून भ्रष्टाचार करायचा, अशी सध्याची कार्यपद्धती आहे. 
आभाळातून कचरा पडलेला नाही
सातारा शहरात ज्यावेळी स्थानिक घंटागाड्यांच्या माध्यमातून कचरा गोळा केला जात होता त्यावेळी घंटागाड्यांना महिन्यापोटी सरासरी साडेपाच लाख रुपये दिले जायचे. हा रकमेचा आकडा 2017 चा आहे. मात्र, 2018 मध्ये ‘साशा’ कंपनीकडे कचरा उचलण्याची  जबाबदारी आल्यानंतर त्यांना प्रत्येक महिन्याला सरासरी  साडेअठरा ते साडेएकोणीस लाख रुपये देण्यात येत आहेत. साविआ सत्तेवर आल्यानंतर सातारा शहरही काही वाढलेले नाही. त्यामुळे सहा महिन्यात सातारा शहरात इतका कचरा वाढलाच कसा, असा प्रश्‍न आम्हाला पडला आहे. सातार्‍यात आभाळातूनच कचरा पडला की काय, अशी शंका आता मला वाटू लागली आहे.
नवरा- बायको एकत्रच राहतात ना..!
सातारा नगरपालिकेतील सातारा विकास आघाडीचे नगरसेवकच ठेकेदार आहेत. मात्र, आम्ही नगरसेवकच असून ठेकेदार नाही, हे पटवून देण्यात कायदेशीर खेळ्या करण्यातही तेच आघाडीवर अन पटाईत आहेत. साविआच्या नगरसेविका सीता हादगे आणि त्यांचे पती राम हादगे हे दांपत्य एकत्र घरातच राहातात हे मलाही माहीतच आहे. परंतु आरोपानंतर आम्ही एकत्र राहत नसून माझे पती राम हादगे आणि माझा काही संबंध नाही. आमच्यात मतभेद आहेत. त्यांना टेंडर देण्यात येवू नये, असे लेखी स्पष्टीकरण सीता हादगे यांनी पालिका मुख्याधिकार्‍यांना दिले आहे.
जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार
दरम्यान, सातारा नगरपालिकेतील सत्ताधारी सातारा विकास आघाडीच्या कार्यपद्धतीच्या विरोधात जोरदार संताप व्यक्त करत आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि नगरसेवकांनी बुधवारी जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांची भेट घेत नगराध्यक्षा माधवी कदम यांचा कारभार मनमानी आहे तर मुख्याधिकारी शंकर गोरे यांची कार्यपद्धती हुकूमशाही असल्याचा गंभीर आरोप केला. आम्हाला आता प्रशासकीय अधिकार्‍यांच्या विरोधातही आंदोलनाचे हत्यार उपसावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.  या अनुषंगाने आवश्यक ती माहिती घेवून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याची ग्वाही जिल्हाधिकारी सिंघल यांनी शिवेंद्रसिंहराजे आणि नविआच्या नगरसेवकांना दिली. यावेळी विरोधी पक्षनेते अशोक मोने, नविआ पक्षप्रतोद अमोल मोहिते, नगरसेवक रवींद्र ढोणे, दीपलक्ष्मी नाईक, लीना गोरे, त्याचबरोबर अन्य नगरसेवक उपस्थित होते. नविआकडून देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे, की सातारा नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेचा अजेंडा रद्द करायचा आणि तत्काळ दुसरा अजेंडा तयार करायचा प्रकार नगरपालिकेत झाला आहे. साविआकडून गलथान आणि मनमानी कारभार सुरू आहे.  सातारा नगरपालिकेत लोकशाही मोडीत काढून हुकूमशाही पद्धतीने कारभार सुरू असल्याने नागरिक, सातारा शहराचे मोठे नुकसान होत आहे. नविआकडून पालिकेच्या मनमानी कारभारावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. भ्रष्ट, हुकूमशाही आणि मनमानी कारभाराला आळा बसावा आणि कायद्याप्रमाणे कारभार  चालावा, अशी आमची मागणी आहे. आम्ही विरोधक म्हणून आमच्या प्रभागातील कामांना अडथळा आणला जात आहे. भाजपच्या नगरसेवकांनाही त्याचा अनुभव येत आहे. रातोरात सभेचा अजेंडा बदलला जात आहे. साविआकडून फक्त डंका वाजवला जात आहे. पेपरबाजी सुरू आहे. विरोधक निवडून दिला म्हणून कोणत्याही प्रभागातील कामांना अटकाव केला जात आहे. बागांच्या ठेकेदारीत मोठा भ्रष्टाचार आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी म्हणून आपण लक्ष घालावे, अशी आमची विनंती आहे. सातारा पालिकेत साविआचा मनमानी कारभार तर सुरूच आहे, त्याचबरोबर प्रशासकीय अधिकारीही त्याला सहकार्य करत आहेत. शहरातील विविध प्रभागातील कामे मार्गी लागत नसल्यामुळे सातारा शहराची पुरती वाट लागली आहे. सातारा शहराच्या विकासावर पालिकेच्या सभेत चर्चा होणे अपेक्षित आहे. मात्र, स्वत:च्या फायद्याचे विषय मनमानीपणे अजेंड्यावर आणले जात आहेत. कोणताही विषय बहुमताच्या जोरावर मंजूर करून पालिकेचे नियम पायदळी तुडविण्याचे काम सत्ताधार्‍यांकडून सुरू आहे.
साविआकडून सातारची वाट..!
आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सातारा विकास आघाडीतील अंतर्गत वादावरही भाष्य केले. ते म्हणाले, ‘लोकांच्या समस्या सुटाव्यात म्हणून कोणी बोलायला तयार नाही. पाणी असूनही सातारकरांना पाणी मिळत नाही. त्यावर काम करण्यापेक्षा सातारच्या विकासाचा प्रश्‍न बाजूला ठेवून अंतर्गत वादावरच जास्त चर्चा आहेत. लोकांसाठी कोणी काम करायला बोलतच नाही. साविआमध्ये अध्यक्षांचा गट वेगळा आहे. स्वीकृतांचा गट वेगळा आहे. त्यांच्या गटबाजीमुळे शहराची पुरती वाट लागत आहे. भ्रष्टाचारी कोण आहे आणि भ्रष्टाचार कोण करते आहे, हे आता लक्षात येवू लागले आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: