Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
सातार्‍यात एस. टी. च्या चाकाखाली सापडून सांगलीची महिला ठार
ऐक्य समूह
Monday, July 09, 2018 AT 11:39 AM (IST)
Tags: lo4
5सातारा, दि. 8 : सातारा मध्यवर्ती बसस्थानकात रविवारी दुपारी दोनच्या सुमारास सांगली येथील एका वयोवृध्द महिलेच्या डोक्यावरुन एस. टी. बसचे चाक गेल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. ठार झालेल्या महिलेचे शकुंतला गणपती जंगम (वय 80, रा. सोनाई, प्लॉट नंबर तीन, त्रिमूर्ती हौसिंग सोसायटी, गुलमोहर कॉलनी, सांगली) असे नाव आहे. त्या सातारा येथील आपल्या भावाकडे आल्या होत्या. सातारा बसस्थानकात उतरल्यानंतर त्या तिकडेच निघाल्या होत्या. मात्र, त्याचवेळी एस. टी.चे चाक त्यांच्या डोक्यावरुन गेले. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक  माहिती अशी, शकुंतला जंगम या नाशिक येथील निफाड येथे एका नातेवाईकाच्या विवाहासाठी जाणार होत्या. तत्पूर्वी त्यांनी सातारा येथे राहणारे आपले  भाऊ सुरेश महादेव जंगम यांच्याकडे एक दिवस राहण्यासाठी येण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर रात्रीच त्या निफाड येथे जाणार होत्या. रविवारी दुपारी त्या सातारा बसस्थानकात उतरल्या आणि बसस्थानकातून बाहेर पडत होत्या.  त्यावेळी रविवार हा सुट्टीचा दिवस असल्याने बसस्थानकात मोठी गर्दी होती. त्याचवेळी सांगलीकडे जाणार्‍या फलाटावर सातारा-सांगली (एमएच 14 - बीटी 3270) ही गाडी लागत होती. शकुंतला तेथेच होत्या. नेमके याचवेळी त्यांना एस. टी.चा धक्का लागला आणि त्या खाली पडल्या. यामध्ये त्यांच्या डोक्यावरुन एस. टी.चे चाक गेले. ही घटना घडल्यानंतर आजूबाजूला असलेल्या प्रवाशांमध्ये खळबळ उडाली. घटनास्थळी मोठी गर्दी झाली. पोलीसही तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. जमाव बाजूला करुन घटनास्थळी रुग्णवाहिका बोलावण्यात आली. यावेळी शंकुतला जंगम यांची पर्स आणि बॅग सापडली. त्यात सापडलेल्या कागदपत्रांच्या आधारे त्यांचे नाव शकुंतला गणपती जंगम असल्याचे समोर आले. पोलिसांनी कागदत्रांच्या आधारावर त्या सातार्‍यात कोणाकडे आल्या होत्या याची माहिती घेतली आणि संबंधितांना त्याची तत्काळ माहिती देण्यात आली. त्यानंतर सातार्‍यातील त्यांचे नातेवाईक तत्काळ सातारा मध्यवर्ती बसस्थानकात आले होते. शकुंतला जगंम यांना तत्काळ क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: