Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
गोरगरिबांच्या हितरक्षणासाठी संघर्षाचा नारा देऊन पुढे जावे लागेल : जयंत पाटील
ऐक्य समूह
Saturday, August 11, 2018 AT 11:24 AM (IST)
Tags: re3
5मल्हारपेठ, दि. 10 : 9 ऑगस्ट क्रांतिदिनाच्या स्मृती जागविताना, स्वराज्याचे सुराज्य झालेल्या या देशात आज सामान्य गोरगरीब माणसाच्या हितरक्षणाकडे शासनाचे दुर्लक्ष होऊ लागले आहे. म्हणूनच आता संघर्षाचा नारा देऊन पुढे जावे लागेल, असे  प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे  प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.
9 ऑगस्ट क्रांतिदिनानिमित्त मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस  आणि राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या संयुक्त विद्यमाने मुंबई सेंट्रल रेल्वे पूर्व ते गवालिया टँक मैदानापर्यंत भारतीय स्वातंत्र्य समरात शहीद झालेल्या जवानांना मूक अभिवादन मिरवणुकीद्वारे मानवंदना देण्यात आली. मिरवणुकीमध्ये मुंबईचे गिरणी कामगार आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. मिरवणूक गवालिया टँक मैदानावर आल्यावर प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री जयंत पाटील, प्रदेश महिला अध्यक्षा चित्रा वाघ, मुंबई अध्यक्ष माजी राज्यमंत्री सचिन अहिर, रा. मि. म. संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते आदींनी हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र वाहून अभिवादन केले.   
प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री जयंत पाटील म्हणाले, जे भाजप कधी स्वातंत्र्यलढ्यात नव्हते तेच प्रारंभापासून स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय  असलेल्या काँग्रेसला उद्देशून काँग्रेस मुक्त भारत करण्याची भाषा करत आहेत. आज आम्ही काँग्रेसमध्ये नसलो तरी प्रथम काँग्रेस विचाराच्या संस्काराने राजकारणात आलो आहोत. या देशात सुई बनत नव्हती पण सत्तेवर आलेल्या काँग्रेस सरकारने केवळ उपग्रह, संशोधनातच नव्हे तर विविध क्षेत्रात प्रगती करुन आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव रोशण केले आहे. तरीही मोदी शासन म्हणते 60 वर्षांत काहीच प्रगती झाली नाही, हे हास्यास्पद आहे. यावेळी त्यांनी बेरोजगारांना नोकरी, घरगुती गॅस सिलिंडरमध्ये केलेल्या दरवाढीवर सडकून टीका केली.
मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्ष सचिन अहिर म्हणाले, चरकाधारी चित्रात महात्मा गांधीजींच्या ऐवजी पंतप्रधानांनी आपला फोटो लावला म्हणून कधी इतिहास बदलत नाही. महात्मा गांधीजींच्या त्यागाचे मोल करता येणार नाही इतके ते महान होते. मुंबईतील 1942 च्या स्वातंत्र्य लढ्याच्या आंदोलनाने इतिहास रचला, हा आदर्श युवापिढीने पुढे न्यावयास हवा आहे.
फसवी आश्‍वासने देत सत्तेवर आलेल्या सरकार विरूद्ध समविचारी पक्षांना एकत्र रस्त्यावर उतरुन चले जावचे आंदोलन छेडावे लागेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी 1942 च्या स्वातंत्र्यलढ्यातील आठवणींना उजाळा दिला. यावेळी काश्मीरमध्ये अतिरेक्यांशी लढताना शहीर झालेले मीरा रोड येथील मेजर कौस्तुभ राणे यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. राष्ट्रवादीचे अशोक धात्रक यांनी सूत्रसंचालन केले. मुंबई राष्ट्रवादी सेवा दलाचे अध्यक्ष दीपक पवार यांनी आभार मानले.  व्यासपीठावर बापू भुजबळ, शिवाजीराव नलावडे, सुधाकर वड्डी, रवींद्र पवार, मुबारक शेख, हरीष सणस, नरेंद्र राणे, राखी जाधव, निवृत्ती देसाई, अण्णा शिर्सेकर, बजरंग चव्हाण उपस्थित होते.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: