Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
राज्यात घातपाताचा कट उधळला; कटाचे ‘सातारा कनेक्शन’
ऐक्य समूह
Saturday, August 11, 2018 AT 11:04 AM (IST)
Tags: mn1
स सातार्‍यातील सुधन्वा गोंधळेकरसह तिघांना अटक
स वीस बॉम्ब व 50 बॉम्बसाठीची स्फोटके जप्त
स महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई
5मुंबई, दि. 10 (प्रतिनिधी) : पुणे, सोलापूर, सातारा व नालासोपारा येथे घातपाती कारवाई करण्याचा कट महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) उधळून लावला. मुंबईजवळील नालासोपारा येथून आणि पुण्यातून हिंदू जनजागृतीच्या तीन सदस्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 20 देशी बॉम्ब आणि 50 बॉम्ब बनवण्याचे साहित्य दहशतवाद विरोधी पथकाने जप्त केले आहे. वैभव राऊत, शरद कळसकर आणि सुधन्वा गोंधळेकर अशी या तिघांची नावे असून विशेष न्यायालयाने या तिघांनाही 18 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अटक केलेला वैभव राऊत हा सनातन संस्थेचा कार्यकर्ता असल्याचा आरोप आहे. मात्र, सनातनने तो आपला साधक नसल्याचे स्पष्ट केले आहे तर सातार्‍यातील करंजे परिसरातील रहिवासी असलेला गोंधळेकर हा शिवप्रतिष्ठानचा कार्यकर्ता असल्याचे समोर आले आहे. मात्र, या संघटनेने त्याचा इन्कार केला आहे. या कटाचे ‘सातारा कनेक्शन’ उघड झाल्याने सातारा शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
दहशतवाद विरोधी पथकाने गुरुवारी रात्री पश्‍चिम रेल्वे मार्गावरील नालासोपारा येथे धडक कारवाई करत भांडार आळीतल्या घरातून तब्बल 20 देशी बॉम्ब आणि 50 बॉम्ब बनवण्याचे सामान जप्त केले. या घरातून वैभव राऊतला अटक करण्यात आली असून वैभवच्या चौकशीनंतर शरद कळसकर आणि सुधन्वा गोंधळेकर या दोघांना एटीएसने अटक केली. आज कोर्टात आरोपींना हजर केल्यानंतर महाराष्ट्रात घातपात घडवण्याचा कट समोर आला. मुंबई सत्र न्यायालयाचे न्यायाधीश समीर अडकर यांच्या विशेष न्यायालयात वैभव राऊतसह शरद कळसकर आणि सुधन्वा गोंधळेकर यांना हजर करण्यात आले. वैभव राऊत, शरद कळसकर आणि सुधन्वा गोंधळेकर या तिघांनाही अडकर यांनी 18 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
दहशतवाद विरोधी पथकाने नालासोपार्‍यात केलेल्या कारवाईत 12 गावठी बॉम्ब, तीन जिलेटीन कांड्या, चार इलेक्ट्रॉनिक डिटोनेटर, 22 नॉन इलेक्ट्रॉनिक डिटोनेटर, सेफ्टी फ्यूज वायर, 1500 ग्राम पांढरी पावडर, विषाच्या एक लिटरच्या दोन बाटल्या, 6 व्होल्टच्या दहा बॅटरींचा बॉक्स, बॅटरी कनेक्टर, कन्व्हर्टर आदी साहित्य एटीएसने जप्त केले आहे. शरद कळसकरकडे बॉम्ब कसा बनवावेत याबाबतची कागदपत्रे सापडली. यातील सुधन्वा गोंधळेकर हा संभाजी भिडे यांच्या शिवप्रतिष्ठान संघटनेशी संबंधित असल्याचे सनातन प्रभात वृत्तपत्रातील एका वृत्तावरून समोर आले आहे तर शरद कळसकर आणि वैभव राऊत हे दोघे हिंदू जनजागृती समितीचे कार्यकर्ते आहेत. या घरात संशयास्पद लोकांची ये-जा असते आणि तेथे मोठ्या प्रमाणात स्फोटकेही ठेवण्यात आल्याची खबर दहशतवाद विरोधी पथकाला मिळाली होती. त्यामुळे मागच्या काही दिवसांपासून तेथे नजर ठेवण्यात येत होती. वैभव राऊतकडे स्फोटके असल्याची ‘टिप’ मिळाल्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून एटीएसने सापळा रचला होता.          
गुरुवारी रात्री खात्री करून वैभव राऊतच्या घरी धाड टाकली असता एटीएसला स्फोटकांचा साठा आढळला. पोलिसांनी वैभवला ताब्यात घेऊन अधिक चौकशी सुरू केली. एटीएसने या कारवाईनंतर डॉग स्कॉड, फॉरेन्सिक टीम यांना बोलावून तपासणीही केली. दहशतवाद विरोधी पथकाने केलेल्या प्राथमिक चौकशीत पुणे, सातारा, सोलापूर व नालासोपारा येथे स्फोट घडवण्याचे षडयंत्र रचण्यात आले होते अशी प्राथमिक माहिती हाती आली आहे.
कटाचे सातारा कनेक्शन
एटीएसने अटक केलेला सुधन्वा गोंधळेकर हा सातार्‍यातील करंजे येथील रहिवासी आहे. सुध्नवा हा शिवप्रतिष्ठानचा कार्यकर्ता असून करंजे येथील झेंडा चौकाजवळ गणपती मंदिरासमोर त्याचे घर आहे. त्याचा पुण्यात ग्राफिक डिझाईनचा व्यवसाय आहे. सुधन्वाचे शिक्षण अनंत इंग्लिश स्कूल, सातारा येथे तर महाविद्यालयीन शिक्षण सरकारी तंत्रनिकेतनमध्ये (पॉलीटेक्निक) झाले आहे. त्याचा विवाह झाला असून त्याला दोन मुली आहेत. वडील  सुधीर गोंधळेकर हे हिंदुत्ववादी संघटनेशी संबंधित असल्याचे समजते. त्यांच्या घरात ‘सनातन प्रभात’ हे वृत्तपत्र येते. सुधन्वाला एक लहान भाऊ असून तो पुणे येथे आयटीचे शिक्षण घेत आहे. आई-वडील सातार्‍यात राहतात. सुधन्वाच्या अटकेमुळे त्याच्या कुटुंबाला धक्का बसला आहे. मात्र, त्याचा या कटाशी काहीही संबंध नसावा, असा विश्‍वास त्याच्या आई-वडिलांनी व्यक्त केला आहे.
दाभोलकर हत्याकांडाशी संबंध तपासणार
दरम्यान, महाराष्ट्रात यापूर्वी घडलेल्या डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे यांच्या हत्येशी एटीएसने अटक केलेल्या तिघांचा काही संबंध आहे का, हे तपासण्यात येणार असल्याची माहिती गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना दिली.
अटक करण्यात आलेल्या वैभव राऊतचा सनातन संस्थेशी संबंध आहे का, असा प्रश्‍न विचारला असता, पोलिसांनी अद्याप कोणत्याही संस्थेचे नाव घेतलेले नाही. तपास सुरू असताना त्यावर वक्तव्य करणे योग्य नाही. तपासाअंती सर्व बाबी स्पष्ट होतील, असे केसरकर म्हणाले. अटक करण्यात आलेल्या संशयितांचा पानसरे, दाभोलकर हत्याकांडाशी संबंध आहे का, असे विचारले असता, कोणत्याही संशयिताला अटक करण्यात येते तेव्हा सर्वच संबंध तपासले जातात. आताही सर्व संबंधांचा तपास होईल, असे केसरकर म्हणाले. सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी होत आहे. त्याबाबत विचारले असता, पोलिसांनी कोणत्याही संस्थेचे नाव घेतलेले नाही. संस्थेचा संबंध आढळून आला तरच बंदीचा प्रश्‍न उद्भवतो, असेही केसरकर म्हणाले.
सनातन संस्थेचा खुलासा
दहशतवाद विरोधी पथकाने अटक केलेला वैभव राऊत हा सनातन संस्थेचा साधक नाही, असा खुलासा संस्थेने केला आहे. मात्र, हिंदुत्ववादी संघटनांच्या अनेक आंदोलनांत त्याचा सहभाग होता. राऊत सनातनचा साधक नसला तरी धर्मासाठी कार्य करणारा कोणताही हिंदू कार्यकर्ता हा सनातनचाच आहे, असे आम्ही मानतो, असे स्पष्टीकरण सनातन संस्थेचे प्रवक्ते चेतन राजहंस यांनी दिले आहे.
वैभव राऊतच्या अटकेमुळे सनातन संस्था पुन्हा वादात सापडली आहे. त्यामुळे सनातन संस्थेचे तातडीने खुलासा करून तो आपला साधक नसल्याचे स्पष्ट केले आहे. वैभवला अटक झाल्यानंतर कोणतेही पुरावे सादर होण्याआधी आणि चौकशी होण्याआधीच काँग्रेसी, पुरोगामी नेते आणि संघटनांनी सनातनवर बंदी घालण्याची मागणी सुरू केली आहे. देशात लोकशाही आणि न्यायालये अद्याप शिल्लक आहेत, हे संबंधित नेते विसरले की काय, असा प्रश्‍न पडला आहे. आणीबाणीत विरोधी पक्ष आणि माध्यमांवर कारवाई करणारे पुन्हा तशीच बंदी सनातनवर घालू इच्छित आहेत. पुरोगामीदेखील सनातनवर बंदी घालण्याची मागणी करू लागले आहेत. ही मागणी खोडसाळपणाची असल्याचे चेतन राजहंस यांनी सांगितले. सनातनला दाभोलकर-पानसरे प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, पाच वर्षे झाली तरी न्यायालयात खटला चालूच नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मडगाव स्फोटातही सनातनला गोवण्याचा प्रयत्न करण्यात आला. नंतर सनातनच्या साधकांची निर्दोष मुक्तताही झाली. सनातनने नेहमीच संविधानिक मार्गाने प्रभावीपणे धर्माचे कार्य केले आहे. त्यामुळेच धर्मविरोधी लोकांना सनातनविषयी पोटशूळ उठल्याची टीका राजहंस यांनी केली.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: