Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मराठा समाजाला आरक्षण देण्याचा जिल्हा परिषदेत ठराव
ऐक्य समूह
Saturday, August 11, 2018 AT 11:21 AM (IST)
Tags: lo2
धनगर, मुस्लीम समाजासाठीही ठराव; शिक्षण विभागाचे वाभाडे
5सातारा, दि. 10 : जिल्हा परिषदेच्या सभेपूर्वी आणि सभेतही राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी मराठा, धनगर, मुस्लीम आरक्षणाचा विषय गाजवला. सभेपूर्वी सदस्यांनी सभागृहाबाहेर  लक्ष्यवेधी ठिय्या आंदोलन केले. तब्बल अर्धा तास हे आंदोलन सुरु होते. एक मराठा लाख मराठा, कोण म्हणतंय देत नाय, आरं घेतल्याशिवाय रहात नाय, अशा घोषणा देत आंदोलकांनी जिल्हा परिषद दणाणून सोेडली. सभेतही आरक्षणाचा ठराव मंजूर करण्यात आला. सभेत आरक्षणाच्या मुद्यावरुन सदस्यांनी एकमेकांवर शेरेबाजीही केली. दरम्यान, शिक्षण विभागाच्या वाभाडे सदस्यांनी सभागृहात काढले.
जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक- निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, शिक्षण व अर्थ समितीचे सभापती राजेश पवार, कृषी सभापती मनोज पवार, महिला व बालकल्याण सभापती वनिता गोरे, समाजकल्याण सभापती शिवाजी सर्वगोड, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन थाडे यांच्यासह जिल्हा परिषदेचे सदस्य उपस्थित होते.
सभा सुरु होण्यापूर्वी छत्रपती शिवाजी सभागृहाबाहेर फरशीवर जिल्हा परिषद सदस्यांनी ठिय्या मारला. एक मराठा लाख मराठा अशी घोषणा देत आंदोलनाला प्रारंभ झाला. जोरदार घोषणा कानावर पडताच केबिनमध्ये बसलेल्या महिला व बालकल्याण सभापती वनिता गोरे, उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे हेही त्यामध्ये सहभागी झाले. त्यानंतर मंगेश धुमाळ, भीमराव पाटील, अ‍ॅड. उदयसिंह पाटील, मानसिंगराव जगदाळे यांची भाषणे झाली. हे आंदोलन सुरु असतानाच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे आले. त्यांनी सभागृहात या मुद्यावर विशेष वेळ देण्यात येईल, अशी विनंती करुन आंदोलन  थांबवण्यास सांगितले. त्यावर सभागृहात ठराव मांडण्यापूर्वी मानसिंगराव जगदाळे यांनी मराठा आरक्षण हा मुद्दा गेली साडेतीन वर्ष गाजत आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देतो परंतु आज मराठा समाजाची वाताहत झाली आहे. आरक्षणाची गरज आहे. ठराव घेण्यात यावा, अशी विनंती केली. मंगेश धुमाळ म्हणाले, या मुद्याचे मी समर्थन करतो. सध्या संपूर्ण राज्यात बिकट अवस्था आहे. गल्लीबोळात मराठा आरक्षणाचे आंदोलन आले आहे. पूर्वी ज्यांचे आरक्षण आहे त्यांना धक्का न लावता मराठा, धनगर, मुस्लीम समाजाला आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी केली. विजय पवार म्हणाले, महाराष्ट्रात 58 मोर्चे काढले आहेत. शासनाने दिरंगाई केली आहे. सहनशीलता संपली आहे. त्यामुळे या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. काही तरुणांवर जे गुन्हे दाखल झाले आहेत. ते गुन्हे मागे घ्यावेत. त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवण्यात यावे, अशी विनंती केली. श्रीनिवास थोरात यांनीही मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशी मागणी केली. सुरेंद्र गुदगे यांनी आमची ओळख ठेवावी, अशी विनंती केली. धैर्यशील अनपट यांनी या मोर्चात सर्वच सहभागी झाले आहेत तर आरक्षण देण्यात अडचण कसली, असा सवाल केला. कोरेगावचे सभापती जगदाळे यांनी लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्यावे, अशी मागणी केली. दीपक पवार यांनी गेली 25 वर्षे मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तसाच आहे. मराठा समाज हा सर्व जातींना सोबत घेवून जाणारा समाज आहे. मात्र आता  तो हतबल झाला आहे. गेली तीन वर्षात भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मकता दाखवली आहे.  
जे 56 मोर्चे झाले. त्याची गिनीज बुकात नोंद झाली आहे. परंतु 25 जुलैच्या मोर्चात समाजकंटक घुसले आणि मराठा मोर्चाला कलंक लागला. हे शासन निश्‍चित न्याय देईल. आमचाही पाठपुरावा सुरु आहे, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. मनोज घोरपडे यांनीही मराठा समाजाच्या भावना लक्षात घेता. लोकसंख्येच्या प्रमाणात 16 टक्के मागणी ही चुकीची असून 32 टक्के आरक्षण दिले गेले पाहिजे, अशी विनंती केली. सुरेंद्र गुदगे यांनी मी नॉन मराठा आहे. 2007 ला ओपनमधून निवडणूक लढली होती. आता ओबीसीमधून निवडून आलो आहे. मराठा समाजातील 70 टक्के परिस्थिती बिकट आहे. जो समाज आर्थिकदृष्ट्या कुमकवत आहे. त्या समाजाला पुढे येण्यासाठी आरक्षणाची गरज आहे. आघाडी सरकारने आरक्षण दिले त्याच धर्तीवर आरक्षण टिकणारे द्यावे. आरक्षणासाठी कायदा बदलण्याची वेळ आली तरी केंद्र सरकारने हा निर्णय घ्यावा आणि आरक्षण द्यावे, असे मत मांडले. संजीवराजे यांनी ठराव मांडला. सर्व सभागृहाने त्यास अनुमोदन दिले. 
सभेत धैर्यशील अनपट यांनी डिजिटल शाळा उपक्रमाची चिरफाड केली. शाळा डिजिटल करता ही चांगली बाब. परंतु पाच वर्षांपूर्वी केलेल्या डिजिटल शाळा, संगणक यांची अवस्था बघा. जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये पिण्याचे पाणी नाही. शौचालय नाहीत. काही ठिकाणची दुरवस्था झाली आहे, असे सांगत एकूणच जिल्हा परिषदेच्या शिक्षण क्षेत्राची दुरवस्थाच सभेत मांडली. त्यानंतर मंगेश धुमाळ यांनी शौचालय दुरुस्ती केवळ कागदावरच दाखवली जाते, असा आरोप केला. अ‍ॅड. उदयसिंह पाटील यांनी कराड पंचायत समितीत विस्तार अधिकारी नाहीत, गटशिक्षणाधिकारी नाहीत, अशा गंभीर बाबी सभागृहासमोर मांडल्या. सुरेंद्र गुदगे यांनी जिल्ह्यात किती गटशिक्षणाधिकारी नाहीत, ते सांगा, असा सवाल केला. प्रभारी शिक्षणाधिकारी सत्यजित बडे यांनी कराड, खटाव, माण, महाबळेश्‍वर येथे नाहीत, असे सांगितले. अरुण गोरे यांनी शाळांवरील शिक्षकांच्या बदल्या केवळ तोंडी आदेशाने केल्या आहेत. कमी पटाच्या शाळेत हे घडले आहे. आमच्या येथे पदवीधर शिक्षक नसतानाही त्यास पदवीधर दाखवून त्याची बदली करण्यात आली आहे. ही बदली गटशिक्षणाधिकार्‍यांनी केली आहे, असा आरोप केला. त्यानंतर सुरेंद्र गुदगे यांनी सातारा तालुक्यात जुंगटी या शाळेत दोन पट आणि दोन शिक्षक आहेत आणि अशा तब्बल दहा ते पंधरा शाळा आहेत, असा आरोप करुन खळबळ उडवून दिली. त्यावर मानसिंगराव जगदाळे यांनीही शिक्षकांच्या बदल्यांचा अजूनही घोळ मिटला नाही, अशी खंत मांडली. त्यावर जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे यांनी ही प्रक्रिया एनआयसीकडून होत असल्याचे सांगितले. त्यावर पुढे गुदगे यांनी बाहेरुन येणारे शिक्षक किती आणि जिल्ह्याबाहेर जाणारे शिक्षक किती?, असा सवाल केला. त्यावर उपशिक्षणाधिकारी जाधव यांनी बाहेरच्या जिल्ह्यातून अजूनही 98 शिक्षक यायचे आहेत. 380 शिक्षकांपैकी 138 शिक्षक बाहेरच्या जिल्ह्यात सोडले आहेत. 10 हजार 72 शिक्षकांच्या जागा रिक्त असून समायोजन करण्यात आले आहे, असे सांगितले. त्यावर गुदगे यांनी पुन्हा एकत्रित लिस्ट करुनच सोडा. एकेक शिक्षक सोडले तर ते कोणालाही कळणार नाही, असा मुद्दा मांडला. त्यनांतर दीपक पवार यांनी शाळा दुरुस्तीची कामे केवळ एकाच गटात जास्त सुरु आहेत. 13 पैकी 9 कामे कशी काय झाली?, तसेच आपण संगणक खरेदी करतो आहोत, त्यांची माहिती सभागृहाला मिळावी?, टेंडर प्रक्रिया होते की नाही, असे प्रश्‍न उपस्थित केले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: