Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
यापुढे रस्त्यावर आंदोलन करणार नाही
ऐक्य समूह
Saturday, August 11, 2018 AT 11:06 AM (IST)
Tags: mn2
मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांची भूमिका
5पुणे, दि. 10 (प्रतिनिधी) : सकल मराठा समाजाच्यावतीने क्रांतिदिनी 9 ऑगस्टला करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र बंद’च्या काळात बाहेरच्या शक्ती घुसल्याने आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचा दावा मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी केला असून यापुढे रस्त्यावर आंदोलन न करण्याची घोषणा त्यांनी केली आहे.
मराठा क्रांती मूक मोर्चा व सकल मराठा समाजाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे, शांताराम कुंजीर, तुषार काकडे, बाळासाहेब आमराळे यांनी आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. मराठा क्रांती मूक मोर्चा आणि सकल मराठा समाजातर्फे 9 ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी आम्ही आंदोलन संपल्याचे जाहीर केले होते. मात्र, त्यानंतर काही जणांनी त्या ठिकाणी गोंधळ घालून गैरवर्तन केले. त्या व्यक्तींशी आमचा काहीही संबंध नसून त्यांना आम्ही ओळखतदेखील नाही, असे मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, यापुढे रस्त्यावर आंदोलन न करण्याची घोषणा मराठा क्रांती मोर्चाने केली आहे. बाहेरच्या शक्ती घुसल्याने आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचा दावा त्यांनी केला. मराठा समाजाला आणि आंदोलनाला बदनाम करण्याचा हा डाव असल्याचा गंभीर आरोपदेखील मराठा क्रांती मोर्चाने केला आहे. त्या व्यक्तींशी आमचा संबंध नसून पत्रकार आणि पोलिसांशी जे गैरवर्तन केले गेले, त्याबद्दल आम्ही मनापासून दिलगिरी व्यक्त करत आहोत, असे ते म्हणाले.  
 आम्ही चाकणच्या आंदोलनापासून सांगत आलो आहोत,
की काही बाहेरील शक्ती आंदोलनात घुसून आंदोलन बदनाम करत आहेत. काही संस्था आणि संघटनांचा यामधे हात असल्याचा अंदाज असून पोलीस तपासात ते निष्पन्न होइल, असे त्यांनी स्पष्ट केले.
दुसरीकडे औरंगाबादच्या वाळूज एमआयडीसीत झालेली तोडफोड मराठा आंदोलकांनी केली नसून जे भांडवलदारधार्जिणे
कायदे आहेत, त्यांच्याविरोधात परप्रांतीय कामगारांनी केली आहे. पगार थकल्याने हा हल्ला झाल्याचे मराठा क्रांती मोर्चाच्या
समन्वयकांनी सांगितले.
चूल बंद आंदोलन
दरम्यान, 15 ऑगस्टपर्यंत मराठा समाजाच्या निरपराध कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेतले नाहीत तर आत्मक्लेश आणि ‘चूल बंद’ आंदोलन करू. त्यानंतर तालुका-जिल्हा स्तरावर साखळी पद्धतीने उपोषण करू, असा इशारादेखील मराठा समाजाकडून देण्यात आला. चक्री उपोषण करण्यात येणार आहे. चक्रीउपोषणात सहभागी होणार्‍या कार्यकर्त्यांसाठी आचारसंहिता तयार केली जाणार आहे, या आचारसंहितेनुसार चक्री उपोषणासह पुढची सर्व आंदोलने अहिंसक व लोकशाही मार्गाने केली जाणार आहेत. अन्य कोणत्याही व्यक्तींनी अथवा नेत्यांनी वेगळे आंदोलन करू नये. तसे केल्यास मराठा क्रांती मोर्चाचा आणि त्यांचा काही संबंध नसेल, असे मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: