Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कराड तालुक्यात सुमारे एक हजार मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल
ऐक्य समूह
Saturday, August 11, 2018 AT 11:11 AM (IST)
Tags: re2
5कराड, दि. 10ः सकल मराठा समाजाने गुरुवारी क्रांतिदिनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंद दिवशी कराड तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी वाहतुकीस अडथळा करून जमावबंदी आदेशाचा भंग केल्या प्रकरणी सुमारे 900 ते 1000 आंदोलकांवर कराड शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सैदापूर कॅनॉल, रेल्वे स्टेशन, ओगलेवाडी चौक व वनवासमाची येथे रस्त्यावर बेकायदा जमाव जमवून, रस्ता अडवून लोकांची गैरसोय केल्या प्रकरणी सहा जणांसह 200 ते 300 अज्ञात आंदोलकांवर कराड शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
अधिकराव सुर्वे (रा. विरवडे, ता. कराड), दीपक लिमकर, सूर्यभान माने (दोघे रा. हजारमाची, ता. कराड), धनाजी माने, दत्ता पाटणकर (रा. पाटणकर मळा, ता. कराड), संदीप तानाजी माने (रा. वनवासमाची, ता. कराड) अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत. तसेच पुणे-बंगलोर महामार्गावर कोल्हापूर नाका, कोयना पूल, खोडशी पूल, पदमा हॉटेल समोर बेकायदा जमाव जमवून मराठा आरक्षण मिळावे याकरिता रस्ता अडवून धरून लोकांची गैरसोय केल्या प्रकरणी सहा जणांसह सुमारे 600 ते 700 अज्ञात आंदोलकांवर कराड शहर पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे. डॉ. पवार वनवासमाची, ता. कराड, कृष्णत पवार (रा. वहागाव, ता. कराड), सचिन सुभाष भोसले, महेंद्र शिवाजी कदम (दोघेही रा. खोडशी, ता. कराड), महेश भोसले, अजित भोसले अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत.
गुरुवारी सकल मराठा समाजाच्यावतीने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती.
 आंदोलकांनी तालुक्यात विविध ठिकाणी रस्ते अडवून रस्त्यावर टायर पेटवणे, ओंडकी आडवी टाकणे, रोडवर जनावरे घेऊन येणे असे प्रकार करून वाहतुकीस अडथळा निर्माण केला होता. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना समजावून सांगून देखील आंदोलकांनी रस्ता अडवून जमावबंदीच्या आदेशाचा भंग केल्या प्रकरणी कराड शहर पोलिसात 900 ते 1000 आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: