Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कराड विमानतळ पुनर्वसन बैठकीवर बाधितांचा बहिष्कार
ऐक्य समूह
Saturday, August 11, 2018 AT 11:26 AM (IST)
Tags: re5
मोजक्याच खातेदारांशी प्रशासनाची चर्चा; कृती समितीचा विस्तारीकरणाला ठाम विरोध
5कराड, दि. 10ः कराड विमानतळ विस्तारवाढीत बाधित होणारे 28 खातेदार व त्यांच्या पुनर्वसनासंबंधित असणार्‍या बैठकीत बाधितांची भूमिका मांडण्यासाठी नव्याने स्थापन झालेल्या कृती समितीला प्रवेश नाकारण्यात आल्याने बाधित सदस्यांनी बैठकीवर बहिष्कार टाकला. यावेळी झालेल्या गोंधळात काही ठरावीक खातेदारांशीच प्रशासनाने चर्चा केली. दरम्यान, बैठकीनंतर प्रशासन व नव्याने स्थापन करण्यात आलेल्या कृती समितीबरोबर झालेल्या चर्चेत विमानतळ विस्तारवाढीला विरोध असल्याचे समितीने ठणकावून सांगितले.
कराड विमानतळ विस्तारीकरणात बाधित होणार्‍या 28 सदस्यांचे शासन कशा पद्धतीने पुनर्वसन करणार आहे, त्यासाठी काय निकष लावण्यात आले आहेत, याबाबत प्रांताधिकारी खराडे यांनी बैठकीत तोंडी माहिती दिली तसेच आठ दिवसात बाधितांनी आपले म्हणणे प्रशासनाला द्यावे, असे सांगितले. यावेळी तहसीलदार राजेंद्र शेळके, विमानतळ प्राधिकरणाचे कृणाल देसाई, मंडल अधिकारी महेश पाटील, वारुंंजीचे सरपंच प्रमोद पाटील यांच्यासह कराड विमानतळ विस्तारवाढ विरोधी बाधितांची कृती समितीचे सदस्य व बाधित खातेदार उपस्थित होते.
कराड विमानतळ विस्तारवाढीत बाधित होणार्‍या 28 खातेदारांना प्रांताधिकारी हिंमत खराडे यांनी दि. 3 ऑगस्ट रोजी नोटीस देऊन  पुनर्वसनासंबंधित आपल्या मालकीची घरे, गोठे, वर्कशॉप आदींची कागदपत्रे घेऊन चर्चा करण्यासाठी तहसीलदार कार्यालयात दि. 10 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता बैठकीला हजर राहण्यास सूचित केले होते. त्यानुसार शुक्रवार, दि. 10 रोजी सकाळी 10 वाजता बाधित होणार्‍या खातेदारांसह परिसरातील नागरिक तहसीलदार कार्यालयात हजर झाले. सकाळी 11.30 वाजता बैठकीला प्रारंभ होण्यापूर्वी फक्त बाधित खातेदारांनाच बैठकीसाठी प्रवेश देण्यात येईल, अशी ताठर भूमिका प्रशासनाने घेतली. यावेळी आम्ही बाधितांच्यावतीने कृती समिती स्थापन केली आहे. त्यानुसार बाधितांसह कृती समिती सदस्यांना प्रवेश देण्यात यावा, अशी विनंती समितीच्यावतीने प्रांताधिकार्‍यांना करण्यात आली. यावेळी बाधितांच्यावतीने कोणी वकीलपत्र घ्यायचे काही कारण नाही, अशी भूमिका पंचायत समितीचे सदस्य नामदेव पाटील यांनी घेतली. यावेळी उपस्थित अन्य बाधित खातेदारांनी आम्ही कृती समिती स्थापन केली आहे. समितीच्यावतीने अध्यक्ष भूमिका मांडतील, असे स्पष्ट केले.
मात्र, प्रशासनाने फक्त बाधित खातेदारांना नोटीस बजाल्याचे सांगत अन्य लोकांना बाहेर जाण्याची सूचना केली. यावेळी वारुंंजी गावचे सरपंच पैलवान प्रमोद पाटील यांनाही बाहेर जाण्याची विनंती करण्यात आली. त्यामुळे अचानक उडालेल्या गोंधळात कृती समितीसह बाधितांनी या बैठकीवर बहिष्कार टाकत बाहेरचा रस्ता धरला. या गोंधळात गडबडून गेलेले बाधित बैठकीतच अडकले.  त्यामुळे प्रशासनाला मोजक्या सदस्यांशी चर्चा करत बैठक आटोपती घ्यावी लागली. त्यानंतर कराड विमानतळ विस्तारवाढ विरोधी बाधितांची कृती समिती व बाधितांनी प्रांताधिकार्‍यांची भेट घेतली. बैठकीत सहभागी होण्यासाठी आलेल्या नामदेव पाटील यांना हे कृती समितीचे सदस्य अथवा कोणी पदाधिकारी नाहीत. त्यामुळे त्यांना या बैठकीत बसता येणार, अशी भूमिका समितीने घेतल्याने प्रांताधिकार्‍यांनी पाटील यांना बाहेर जाण्याची विनंती केली. या बैठकीत कृती समितीने सर्व बाधितांसह परिसरातील नागरिकांचा विमानतळ विस्तारीकरणाला विरोध असल्याचे स्पष्ट केले. प्रशासनाने ही विस्तारवाढ रेटण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला तसेच कोणत्याही परिस्थितीत ही विस्तारवाढ होऊ दिली जाणार नाही. त्यासाठी लोकशाही पद्धतीने आंदोलन हाती घेण्यात येईल. शिवाय वेळप्रसंगी या प्रकरणी जनहित याचिका दाखल केली जाईल, असा इशाराही दिला. डॉ. भारत पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या लढ्याला नवीन कृती समितीचा पाठिंबाच आहे. या लढ्याला ताकद देण्यासाठी नवीन कृती समितीची स्थापना केल्याचे एकमुखी सर्व बाधित व उपस्थित नागरिकांनी सांगितले.


© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: