Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
सह्याद्रि कारखान्यावर संत घाडगेनाथ महाराज पालखीचे स्वागत
ऐक्य समूह
Saturday, August 11, 2018 AT 11:25 AM (IST)
Tags: re5
5मसूर, दि. 10 : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला पायी चालत जाणार्‍या कोळे येथील संत घाडगेनाथ महाराज पायी वारी पालखी दिंडीचे परतीच्या प्रवासात सह्याद्रि साखर कारखाना कार्यस्थळावर जल्लोषात स्वागत करण्यात आले.
सालाबादप्रमाणे यावर्षीही संत घाडगेनाथ महाराज पायी वारी पालखी दिंडी कारखाना कार्यस्थळावर हजर होताच हरिनामाच्या गजरात कारखान्याचे संचालक संजय जगदाळे, कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील, कामगार व कल्याण अधिकारी निवासराव जाधव, जनसंपर्क अधिकारी विश्‍वासराव शेलार, ऊस विकास अधिकारी वसंतराव चव्हाण आदींनी कारखाना व्यवस्थापनाच्यावतीने दिंडीचे स्वागत केले. यावेळी कार्यकारी संचालक आबासाहेब चव्हाण यांनी दिडीची पार्श्‍वभूमी आणि कारखाना प्रशासनाच्यावतीने दिंडीसाठी करण्यात येणार्‍या सुविधांबाबत माहिती दिली व भाविकांचे स्वागत केले.
सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आ. बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना प्रशासनाने प्रतीवर्षाप्रमाणे या दिंडीसाठी उपस्थित होणार्‍या सर्व भाविकांसह दिंडीकरांना महाप्रसादाचे आयोजन केले होते. यावेळी नडशी भजनी मंडळाचेे भजन त्यानंतर महाआरती झाल्यानंतर दिंडीभोवती गोल रिंगण घालण्यात आले. या ठिकाणी पालखीचे दर्शन घेण्यासाठी व हा नयनरम्य सोहळा याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी कारखाना परिसरासह नडशी, शहापूर, पिंपरी, शिरवडे, यशवंतनगर, उत्तर कोपर्डे आदी गावचे ग्रामस्थ उपस्थित होते. टाळ, मृदुंग व हरिनामाच्या गजरात संपूर्ण परिसर दुमदुमला.
याप्रसंगी विणेकरी आबाजी पाटील, सौ. शांताताई थोरात, दिनकर चव्हाण, अमृतराव थोरात, आनंदराव थोरात, गोविंदराव थोरात, शंकरराव पाटील, अशोकराव थोरात, तानाजी थोरात, अशोक निकम यांच्यासह हजारो भाविक उपस्थित होते.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: