Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  खेळ वार्ता  >>  बातम्या

आशियाई क्रीडा स्पर्धेत बजरंग पुनियाचा सुवर्ण वेध
vasudeo kulkarni
Monday, August 20, 2018 AT 11:43 AM (IST)
Tags: sp1
5जकार्ता, दि. 19 (वृत्तसंस्था) : भारताच्या बजरंग पुनियाने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. बजरंगने कुस्तीतील 65 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले आहे. भारताचे हे पहिलेच सुवर्णपदक ठरले आहे.
बजरंगने 65 किलो वजनी गटामध्ये जपानच्या  मल्लाचा 10-8 असा पराभव केला आणि सुवर्णपदक पटकावले. अंतिम फेरीचा सामना चांगलाच रंगतदार झाला. हा सामना नेमका कोण जिंकेल, हे सहजा सहजी सांगता येत नव्हते. पण बजरंगने तांत्रिक गोष्टींवर जास्त भर दिला. त्याचबरोबर अनुभवही त्याने पणाला लावला होता. अखेरच्या काही क्षणांमध्ये बजरंगने सरस खेळ केला. त्यामुळेच त्याला हे सुवर्णपदक पटकावता आले.
नेमबाजीच्या मिश्र दुहेरीत भारताला कांस्य
आशियाई स्पर्धेत 10 मीटर नेमबाजीच्या मिश्र दुहेरी प्रकारात अपूर्वी चंदेला आणि रवी कुमार यांच्या जोडीने कांस्य पदकाची कमाई केली आहे. पात्रता फेरीत पाचव्या स्थानावर असलेल्या चीनी ताइपेच्या नेमबाजांनी सुवर्ण तर चीनने रौप्य पदकाची कमाई केली. रवी कुमारसाठी वैयक्तिक स्वरुपात ही मोठी कामगिरी आहे. 28 वर्षीय रवी कुमारने 2014 मध्ये आशियाई स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले होते आणि 2018 मध्ये कॉमनवेल्थ गेम्समध्ये त्याने कांस्य पदक जिंकले होते. अपूर्वी चंदेलाने 2014 च्या कॉमनवेल्थ स्पर्धांमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. भारतीय जोडीचा पात्रता फेरीतला स्कोअर 835.3 होता तर कोरियाने 836.7 गुण मिळवत भारताच्या पुढचे स्थान पटकावले होते.
सुशील कुमारला पराभवाचा धक्का
दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेता भारताचा आघाडीचा कुस्तीपटू सुशील कुमारला आज एशियाड खेळांच्या पहिल्या दिवशी पराभवाचा सामना करावा लागलो. पहिल्याच सामन्यात 74 किलो वजनी गटात सुशीलला बहारिनच्या अ‍ॅडम बतिरोव्हने पराभवाचा धक्का दिला. सामन्यात सुरुवातीला आघाडी घेऊनही, अखेरच्या सत्रात केलेला बचावात्मक खेळ सुशीलला महागात पडला.
सुशीलवर मात करणारा बतिरोव्ह अंतिम फेरीत गेल्यास सुशीलला रेपिचाजमध्ये कांस्यपदकासाठी लढण्याची संधी मिळणार होती. मात्र बतिरोव्हला उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागल्यामुळे सुशीलचे या स्पर्धेतले आव्हान संपुष्टात आले आहे. या स्पर्धेत भारताला सुशीलकडून पदकाची आशा होती, मात्र सुशीलने आपल्या चाहत्यांना निराश केलेे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: