Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
शेंद्रे येथे हायवेवर एस.टी. चालकाला मारहाण करणार्‍या दोघांना कोठडी
ऐक्य समूह
Wednesday, October 03, 2018 AT 11:06 AM (IST)
Tags: lo1
5सातारा, दि. 2 : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शेंद्रे गावच्या हद्दीत दोन युवकांनी एस.टी. चालकाला पट्ट्याने बेदम मारहाण करत शिवीगाळ, दमदाटी केल्याची घटना घडली. या घटनेमुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. या घटनेतील दोन्ही संशयितांना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे. अटक करण्यात आलेल्यांची संजय राजाराम साळुंखे व सुजित सुनील शिवदास (दोघे रा.बोरगाव, ता.सातारा) अशी नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, सोमवारी दुपारी 1 च्या सुमारास शेंद्रे गावच्या हद्दीत महामार्गावर एस.टी. व दुचाकी यांच्यामध्ये साईट देण्यावरून वादावादी झाली. त्याचा राग मनात धरून दुचाकीवरील दोन युवकांनी एस.टी. थांबवली. त्यातील दोन्ही युवकांनी एस.टी. चालकाला थेट केबिनमधून खाली ओढण्याचा प्रयत्न केला. एस.टी. चालकाने प्रतिकार करताच त्यातील एका युवकाने पट्टा काढून मारहाण करण्यास सुरुवात केली. भरदुपारी महामार्गावर मारामारीचा प्रकार घडला. या प्रकारामुळे एस.टी.मधील प्रवासी घाबरले. परिसरातील काही जणांनी दोन्ही युवकांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र युवक ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते. हा सर्व प्रकाराचे एस.टी.तील एका प्रवाशाने मोबाईलमध्ये चित्रीकरण केले. या घटनेची माहिती जिल्हा वाहतूक पोलिसांना समजल्यानंतर जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार जयवंत भोकरे व देवानंद बर्गे यांनी त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी यावेळी प्रवाशांची चर्चा करून नेमकी चूक कोणाची आहे हे पाहण्याचा प्रयत्न केला. सुमारे एक तास हा गोंधळ सुरू होता. महामार्गावरील या घटनेने परिसरातील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. पोलिसांनी एस.टी. चालकाची व युवकांची बाजू ऐकल्यानंतर त्यांना सातारा तालुका पोलीस ठाण्यात नेले. एस.टी. चालकाने तक्रार असल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांनी त्यानुसार दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी संशयितांना अटक केली. फौजदार एस.बी.जाधव पुढील तपास करत आहेत.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: