Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पोलीस ठाण्यासमोरच सुरू होता जुगार अड्डा
ऐक्य समूह
Monday, October 08, 2018 AT 11:16 AM (IST)
Tags: lo2
जागरुक नागरिकांमुळे पोलिसांना कळले
5सातारा, दि. 7 : पोलिसांच्या घराशेजारीच जुगार अड्डा चालवणार्‍यांना अखेर पोलिसांनी पकडले आहे. सातारा पोलीस मुख्यालय परिसरात व शहर पोलीस ठाण्यासमोर हा जुगाराचा अड्डा भरत होता. पोलिसांना याची सुताराम माहिती नव्हती. जागरुक नागरिकांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी अड्ड्यावर छापा टाकून चौघांना अटक केली. 
अटक केलेल्यांची शामसुंदर महादेव लोकरे (वय 58, रा.गोडोली), रामचंद्र भानू माने (वय 44, रा.मंगळवार पेठ), सुरज चंद्रकांत रोकडे (वय 21, रा.संभाजीनगर), सुरज भानुदास मोरे (रा.करंजे) अशी नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी मटका, जुगार अड्डे उद्ध्वस्त करण्याचे आदेश पोलीस दलाला दिले आहेत. त्यामुळे पोलिसांकडूनही जोरदार कारवाया सुरु आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर कारवाया सुरु असतानाही पोलीस ठाण्यासमोर  म्हणजे अगदी पोलिसांच्या घरात घुसूनच जुगार अड्डा चालवला जात होता. ही माहिती  काही जागरुक नागरिकांच्या लक्षात आली. त्यांनी याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर त्यांनी तातडीने त्या ठिकाणी पोलिसांचे पथक पाठवून छापा टाकला. मल्हार पेठेतील भवानी मंदिराच्या परिसरात हा जुगाराचा अड्डा सुरु होता. हे ठिकाण शहर पोलीस ठाण्याच्या लॉक रुमच्या विरुध्द दिशेला आहेे. पोलिसांनी घटनास्थळी पाहिले 
असता जुगार खेळला जात असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी छापा टाकताच संशयितांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी सर्वांच्या मुसक्या आवळल्या आणि रोख 2 हजार रुपये व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. याप्रकरणी एलसीबीचे पोलीस हवालदार मुबीन मुलाणी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: