Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मिग-29 ची मारक क्षमता वाढली
ऐक्य समूह
Monday, October 08, 2018 AT 11:22 AM (IST)
Tags: na2
5आदमपूर, दि. 7 (वृत्तसंस्था) : भारतीय हवाई दलाने आपल्या ताफ्यातील ‘मिग-29’ या विमानांमध्ये बदल करत त्यांचा वेग आणि मारक क्षमता वाढवली आहे. लढाऊ विमानांची कमी होणारी संख्या लक्षात घेवून भारतीय हवाई दलाने मिग विमानांना अधिक शक्तिशाली आणि संहारक बनवले आहे.
रशियन बनावटीची मिग विमाने आता हवेतच इंधन भरू शकतात. तसेच या विमानातून एकावेळी अनेक दिशांना मारा करता येऊ शकतो. ही विमाने चीन आणि पाकिस्तानवर नजर ठेवण्यासाठीही महत्त्वाची आहेत, अशी माहिती हवाई दलाच्या अदमपूर विमानतळावर तैनात असलेल्या फ्लाइट लेफ्टनंट करन कोहली यांनी दिली.
या पूर्वीच्या व्हर्जनमधील मिग विमानांनीही महत्त्वाचे योगदान दिले होते. 1999 च्या कारगिल युद्धा दरम्यान ‘मिग-29’ विमानांनी मोठी कामगिरी बजावली होती. गेल्या आठवड्यात हवाई दलाच्या अदमपूर विमानतळावर अपग्रेड केलेल्या ‘मिग-29’ विमानांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. हवाई दलाच्या सोमवारी होणार्‍या स्थापना दिनाच्या कार्यक्रमात ही विमाने आपली प्रात्यक्षिके सादर करणार आहेत. या विमानांमध्ये मल्टि-फंक्शनल डिस्प्लेही लावण्यात आला आहे.
हवाई दलाचे अदमपूर विमानतळ हे पाकिस्तानपासून 100 किमी आणि चीनपासून 250 किमी अंतरावर आहे. यामुळे सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या या विमानतळावर अपग्रेड केलेली ‘मिग-29’ विमाने तैनात करण्यात आली आहेत. हवाई दलातील ‘मिग-29’ विमानांची तीन स्क्वॉड्रन सध्या कार्यरत आहेत. या पैकी दोन स्क्वॉड्रन अदमपूर विमानतळावर तैनात आहेत. एका स्क्वॉड्रनमध्ये किमान 16-18 विमाने असतात. भारताच्या हवाई हद्दीत घुसखोरीची कुठलीही माहिती मिळताच ‘मिग-29’ हे विमान केवळ 5 मिनिटात उड्डाण करू शकते, अशी माहिती कोहली यांनी दिली.
अपग्रेड केलेल्या ‘मिग-29’ विमानांची मारक क्षमता आता उत्तम झाली आहे. या विमानांद्वारे आपण हवेतून हवेत, हवेतून-जमिनीवर आणि समुद्रातील जहाजांविरोधातही कारवाई करू शकतो.    
‘मिग-29’च्या अपग्रेड व्हर्जनमध्ये सर्व अत्याधुनिक फिचर्स आहेत, अशी माहिती ‘मिग-29’ विमान उडवणार्‍या एका पायलटने दिली. हवाई दलाच्या अदमपूर विमानतळाने 1999 च्या कारगिल युद्धात मोठी भूमिका बजावली होती. भारतीय लढाऊ विमानांनी शत्रूची विमाने 15 हजार फूट उंचीवरच उद्ध्वस्त केली होती.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: