Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
माची पेठेत मद्यपी युवकांचा धुडगूस
ऐक्य समूह
Tuesday, October 09, 2018 AT 11:16 AM (IST)
Tags: lo1
हॉटेलचालक व नागरिकांना लाकडी दांडक्याने मारहाण
5सातारा, दि. 8 : हॉटेलचालकाला मारहाण करणार्‍या मद्यपी टोळक्याला रोखण्यासाठी पुढे आलेल्या महिला व नागरिकांनाही त्या टोळक्याने लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना शहरातील माची पेठेत रविवारी रात्री घडली. या टोळक्याने सुमारे अर्धा तास धुडगूस घातला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या प्रकरणी शहर पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
अभिजित चंद्रकांत महाडिक (रा. ढोल्या गणपती मंदिराशेजारी, सातारा), साईनाथ संभाजी पवार (रा. मंगळवार पेठ, सातारा), बापू बबन सकटे (रा. जकातवाडी), शांताराम कोंडिबा खरात व अक्षय पांडुरंग जगताप (दोघे रा. माची पेठ, सातारा) आणि आनंदा संभाजी सकटे (रा. शहापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे असून हॉटेलचालक वैभव जयवंत परदेशी (वय 29, रा. बुधवार पेठ) यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वैभव परदेशी यांचे माची पेठेत हॉटेल असून रविवारी (दि. 7) सायंकाळी सातच्या सुमारास एकाने दारु पिण्यासाठी त्यांच्या हॉटेलमधून पाण्याचा जग नेला होता. त्याच्याबरोबर अन्य काही युवक दारू पीत होते. बराच वेळ झाला तरी संबंधिताने पाण्याचा जग परत आणून दिला नाही. हॉटेल बंद करायची वेळ झाल्याने हॉटेलमधील अझर आगाने संबंधित युवकांना पाण्याचा जग मागितला. त्यामुळे चिडलेल्या युवकांनी अझर आगाला मारहाण केली. गजबजलेल्या परिसरात संशयितांनी दहशत निर्माण केल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. अझर संशयितांना विनवणी करत असताना तेथील नक्षत्र अपार्टमेंटमधील चंद्रकांत पवार हे भांडण सोडवायला पुढे गेले. त्यावेळी मद्यधुंद संशयितांनी पवार यांना त्यांच्याच घरात घुसून मारहाण केली. संशयितांनी अपार्टमेंटमध्ये घुसून लाकडी दांडक्याने मारहाण  करत राडा केल्याने परिसरातील महिला व नागरिक भयभीत झाले. पवार यांची पत्नी मध्ये पडली असता संशयितांनी त्यांनाही मारहाण केली. या टोळक्याने अपार्टमेंटमधील पन्हाळे, कायस्थ या कुटुंबीयांनाही दमदाटी व शिवीगाळ केली.
या प्रकाराची माहिती मिळाल्यावर शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी संशयित पळून गेले. त्यातील दोघांना पकडण्यात पोलिसांना यश आले. या संशयितांविरुध्द गुन्हा दाखल करून पोलिसांनी दोघांना अटक केली. या प्रकारामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले असून संशयितांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: