Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
टिपरने दुचाकीस्वारास फरपटत नेले
ऐक्य समूह
Wednesday, October 10, 2018 AT 11:04 AM (IST)
Tags: re2
फलटणमध्ये भीषण अपघातात प्राथमिक शिक्षक ठार
5फलटण, दि. 9 : फलटण शहरातील वर्दळीच्या रस्त्यावर शासकीय विश्रामगृहाजवळ मंगळवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात हायवा (टिपर) ट्रकने दुचाकीस्वारास धडक देऊन फरपटत नेल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. रामदास राजाराम भोसले (वय 50, रा. पंचबिघा, गोखळी, ता. फलटण, हल्ली, रा. सजाई गार्डन कार्यालयानजीक, फलटण) असे मृताचे नाव आहे.
शासकीय विश्रामगृहापासून गिरवी नाक्याकडे मंगळवारी सायंकाळी 5.30 च्या सुमारास निघालेल्या हायवा ट्रकने (एमएच-11-एएल-6543) पुढे निघालेल्या दुचाकीस (एमएच-11-एडी-2874) जोराची धडक दिल्याने रामदास भोसले हे खाली पडले. मात्र, त्यानंतर ट्रकने दुचाकीसह भोसले यांनाही 10 ते 15 फूट फरपटत नेले. या भीषण अपघातात त्यांच्या डोक्याला, शरीराला व हातापायास मार लागून ते गंभीर जखमी झाले. त्यांच्या कानातून रक्तस्राव झाला. अपघातस्थळापासून जवळच असलेल्या अधिकारगृहासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे धरणे आंदोलन सुरू आहे. त्यात सहभागी असलेल्या धनंजय महामुलकर व त्यांच्या सहकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेऊन भोसले यांना तातडीने  रुग्णालयात पाठविले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. नांदल, ता. फलटण येथील प्राथमिक शाळेत शिक्षक असलेले रामदास भोसले हे गोखळी, ता. फलटण गावचे पोलीस पाटील विकास शिंदे यांचे मामा होत. भोसले यांच्या पश्‍चात आई, वडील, भाऊ, पत्नी, दोन मुले, मुलगी, जावई असा परिवार आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: