Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
दिवाळीच्या सुट्टीत एसटी प्रवास महागणार
vasudeo kulkarni
Wednesday, October 10, 2018 AT 10:57 AM (IST)
Tags: mn2
31 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून दहा टक्के भाडेवाढ
5मुंबई, दि. 9 (प्रतिनिधी) : दरवर्षीप्रमाणे गर्दीच्या हंगामात (दिवाळी सुट्टीच्या कालावधीत) सरसकट दहा टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. 31 ऑक्टोबरपासून ही दरवाढ लागू होणार असून ही दरवाढ केवळ 20 नोव्हेंबरपर्यंत, म्हणजे केवळ 20 दिवसांसाठी असेल, असे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सांगितले. डिझेलचे वाढलेले दर आणि त्यामुळे होणारा तोटा भरून काढण्यासाठी नियमित दरवाढीचा प्रस्ताव प्रलंबित असून त्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दिवाळी व सुट्टीच्या काळात खाजगी वाहतूकदार भरमसाट भाडेवाढ करून नफा कमावतात. एसटी महामंडळानेही त्याच धर्तीवर परिवर्तनशील भाडेवाढीचे सूत्र लागू केले असून गर्दीच्या हंगामात 30 टक्क्यांपर्यंत भाडेवाढ करण्यात येते. अशी भाडेवाढ करण्याचे अधिकार राज्य परिवहन प्राधिकरणाने उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांना दिले आहेत. त्यानुसार दरवर्षी गर्दीच्या हंगामात (दिवाळी सुट्टीच्या कालावधीत) तात्पुरत्या स्वरूपाची भाडेवाढ करण्यात येते. यंदा मात्र दरवर्षीप्रमाणे सेवा प्रकारानुसार 20, 15 व 10 टक्के अशी भाडेवाढ न करता सर्व सेवा प्रकारांसाठी सरसकट 10 टक्के भाडेवाढ करण्यात आली आहे. 31 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून ही भाडेवाढ लागू होणार असून ती 1 ते 20 नोव्हेंबर अशा 20 दिवसांसाठी लागू असेल. मागील वर्षापेक्षा यंदाची भाडेवाढ कमी असल्याचे रावते यांनी सांगितले.
 एसटी महामंडळाने 15 जूनला 18 टक्के दरवाढ केली होती; परंतु डिझेलचे दर सातत्याने वाढत असल्याने महामंडळाचा तोटा कायम आहे. त्यामुळे आणखी 10 टक्के भाडेवाढ करण्याचा महामंडळाचा प्रस्ताव आहे. दिवाळीमुळे तात्पुरती भाडेवाढ करताना हा प्रस्ताव तूर्त बाजूला ठेवण्यात आला आहे. मात्र, डिझेलचे दर असेच वाढत राहिल्यास दिवाळीनंतर याबाबत निर्णय घेऊन सध्या केलेली तात्पुरती दरवाढ कायमसाठी लादली जाऊ शकेल, असे संकेत आहेत.
भाढेवाढ रद्द करा : धनंजय मुंडे
दरम्यान, राज्यात अभूतपूर्व दुष्काळ असल्याने कोणताच सण साजरा करावा, अशी जनतेची परिस्थिती नसून त्यासाठी पैसाही नाही. त्यामुळे एसटी महामंडळाने दिवाळीच्या सुट्टीतील 10 टक्के भाढेवाढीचा निर्णय रद्द करून जनतेला दिलासा दिला द्यावा, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. मुंडे म्हणाले, सरकारने राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घ्यावी. एसटीमधून फक्त गरीब व सर्वसामान्य लोक प्रवास करतात. वाढीव भाड्याचा भुर्दंड त्यांनाच सोसावा लागणार असल्याने यावर्षी ही भाडेवाढ रद्द करावी. शिवसेना सत्तेत असूनही कायम आपण जनतेच्या प्रश्‍नांवर भांडत आहोत, असा खोटा आव आणते. सर्वसामान्य जनतेची त्यांना खरोखरच काळजी असेल तर त्यांच्या मंत्र्यांच्या ताब्यात असलेल्या खात्यातील दरवाढ रद्द करून दाखवावी, असे आव्हान देतानाच शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी तसे आदेश त्यांना द्यावेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: