Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
भूमाता ब्रिगेडच्या माधुरी टोणपेला अखेर अटक
ऐक्य समूह
Wednesday, October 10, 2018 AT 11:03 AM (IST)
Tags: re1
5कराड, दि. 9 : कराड शेती उत्पन्न बाजार समितीचे संचालक अशोकराव पाटील-पोतलेकर यांना अनैतिक संबंधाच्या कारणावरून बदनामीची धमकी देत 10 लाख रूपये खंडणी व एका फ्लॅटची मागणी करत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भूमाता ब्रिगेडच्या पदाधिकारी संशयित माधुरी टोणपे (सध्या रा. टेंभू, ता. कराड) यांना कराड शहर पोलिसांनी सोमवारी अटक केली.  यात पाच महिलांविरूध्द गुन्हा नोंद झाला होता. त्यापैकी चार महिलांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कराड बाजार समितीचे संचालक अशोकराव बाबूराव पाटील (रा. आगाशिवनगर)  यांची प्राथमिक आरोग्य केंद्रातील एका नर्सबरोबर नोव्हेंबर 2014 मध्ये ओळख झाली होती. ओळखीतून दोघांमध्ये अनैतिक संबंध प्रस्थापित झाले. काही दिवसानंतर ती महिला पाटील यांना ब्लॅकमेल करू लागली. तिच्या धमक्यांना व त्रासाला कंटाळून पाटील यांनी पोलिसात तक्रार दिली.  काही दिवसानंतर त्या महिलेने 10 लाख रूपये तसेच फ्लॅटची मागणी करून मागणी पूर्ण झाली नाहीतर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी पाटील यांना दिली. महिलेने त्यांच्या विरोधात कोरेगाव पोलीस स्टेशन-मध्ये अ‍ॅट्रॉसिटी व अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्याचे त्यांना समजले. या गुन्ह्यात त्यांनी उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळवला. त्यानंतरही तक्रार मागे घेण्यासाठी  तिने पाटील यांच्याकडून 7 लाख 15 हजार रूपयांची रक्कम धनादेशाद्वारे घेतली व तडजोड करून गुन्हा मागे घेतला. मात्र, धमक्यांना पाटील दाद देत नसल्याने तिने भूमाता ब्रिगेडच्या पदाधिकारी माधुरी टोणपे यांच्याशी संपर्क साधला. माधुरी टोणपे यांच्यासह अन्य तीन महिलांना घेऊन ती पाटील यांच्या औषध विक्रीच्या दुकानात व घरी गेली. तेथे माधुरी टोणपे यांच्यासह महिलांनी तू तिला भेटलाच पाहिजे अन्यथा तुझ्या घरावर महिलांचा मोर्चा आणू, तुझा संसार उद्ध्वस्त करू, असे धमकावले. तसेच ‘एवढ्या कमी पैशात अशा केसेस मिटत नसतात. तू तिला भेटायला ये, अन्यथा ती पोलीस स्टेशनच्या बाहेर उभी असून तिच्या हातात विषाची बाटली आहे, असे माधुरी टोणपे यांनी फोनवरून पाटील यांना सांगितले. यावेळी माधुरी प्रकाश सोनटक्के (वय 32), रा. हिंगणगाव, ता. कडेगाव, माधुरी टोणपे व अन्य तीन महिलांनी 10 लाख रूपये व एक फ्लॅट देण्याची मागणी अशोकराव पाटील यांच्याकडे केली. त्यांच्या त्रासाला कंटाळून अशोकराव पाटील यांनी 28 डिसेंबर रोजी रात्री राहत्या घरात पिकावर मारण्याचे रोगर हे औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यामधून ते बचावल्यानंतर त्यांच्या जबाबावरून पुणे येथील अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पुढील तपासासाठी हा गुन्हा कराड शहर पोलिसांकडे वर्ग झाला. त्यानंतर या गुन्ह्यात तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपिका जौंजाळ यांनी सोनटक्केसह चार संशयित महिलांना अटक केली होती. मात्र माधुरी टोणपेच्या अटकपूर्व जामीन अर्जावर उच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. अखेर उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर संशयित टोणपेला सपोनि जौंजाळ यांनी सोमवारी अटक केली.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: