Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
गाळा देण्याचे आश्‍वासन देवून शिक्षकाची पाच लाखाची फसवणूक
ऐक्य समूह
Friday, October 12, 2018 AT 11:24 AM (IST)
Tags: lo3
5सातारा, दि. 11 : शाहूपुरी येथे बांधत असणार्‍या इमारतीत गाळा देण्याचे आश्‍वासन देवून शिक्षकाची 5 लाख रुपयांची फसवणूक करणार्‍या तीन जणांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहेे.
या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्यांची विजय दत्तू बोरकर (रा. कात्रज, पुणे), जतीन कांतीलाल सुराना (रा. मुकुंदनगर, पुणे), अश्‍विन वसंतराव सूर्यवंशी (रा. दत्तछाया कॉलनी, शाहूपुरी) अशी नावे आहेत.  या प्रकरणी शिक्षक  अजय रघुनाथ दिघे (रा.आंबेघर, ता.जावली) यांनी तक्रार दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शाहूपुरी येथील माहेश्‍वरी कॉर्नरच्या जागेत इमारत बांधण्यात येत असल्याची माहिती तक्रारदार यांना मिळाली होती. दिघे यांनी त्या ठिकाणी जावून पाहणी केली व सुरू असणार्‍या इमारतीत एक गाळा विकत घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार दिघे यांनी संबंधित तिघांशी चर्चा केली. त्यानुसार दि. 21 नोव्हेंबर 2015 मध्ये त्या तिघांना धनादेशाद्वारे 5 लाख रुपये दिले. मात्र तिघांनी गाळा खरेदी करण्याबाबतचा करार करून देण्यास टाळाटाळ सुरू केली. वारंवार संपर्क करूनही ते तिघे खरेदी करार करून देण्याचे तसेच घेतलेले पैसे परत देण्यास टाळाटाळ करू लागले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर दिघे यांनी याची बुधवारी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दिली.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: