Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
भाजपचे चाळीस आमदार, सात खासदार पराभवाच्या छायेत
ऐक्य समूह
Friday, October 12, 2018 AT 11:17 AM (IST)
Tags: mn1
गोपनीय अहवालामुळे भाजपमध्ये खळबळ
5मुंबई, दि. 11 (प्रतिनिधी) : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजपने एका खाजगी संस्थेद्वारे केलेल्या पाहणीत पक्षाचे 40 ते 45 आमदार आणि सात खासदार पुन्हा निवडून येणार नाहीत, असा निष्कर्ष पुढे आल्याने भाजपमध्ये खळबळ उडाली आहे. मुंबईत मंगळवारी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सर्व आमदारांच्या हातात त्यांचे अहवाल सोपवल्यावर अनेकांना धक्का बसला आहे.
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर भाजपने एका खाजगी संस्थेकडून विधानसभेच्या सर्व 288 आणि लोकसभेच्या 48 मतदारसंघांचे सर्वेक्षण करून घेतले. भाजपचे खासदार व आमदार असलेल्या मतदारसंघांमधील सद्य राजकीय स्थिती आणि आमदार, खासदारांच्या कामगिरीचाही आढावा घेण्यात आला. या सर्वेक्षणात भाजपच्या विद्यमान 122 आमदारांपैकी 40 ते 45 आमदार आणि 23 खासदारांपैकी सात जण पुढील निवडणुकीत निवडून येण्याची शक्यता नसल्याचे संस्थेने सादर केलेल्या गोपनीय अहवालात म्हटले आहे, असे समजते.
सर्वेक्षण करणार्‍या संस्थेने मतदारसंघातील राजकीय स्थिती, तेथील जातीय व सामाजिक समीकरणं, प्रलंबित प्रश्‍न, लोकांच्या जिव्हाळ्याचे व नाराजीला कारणीभूत असणारे विषय, वयोगटानुसार असणारे कल याबाबत सविस्तर अहवाल सादर केले आहेत. प्रत्येक आमदार व खासदाराला मंगळवारी त्याच्या मतदारसंघाचा अहवाल बंद लिफाफ्यातून देण्यात आला. अहवालात व्यक्त केलेल्या बाबी लक्षात घेऊन पुढील काळात आपल्या कामगिरीत सुधारणा करण्याची ताकीद त्यांना देण्यात आली आहे. याच संस्थेकडून डिसेंबर व मार्च महिन्यात आणखी दोन वेळा सर्वेक्षण करण्यात येणार असून त्यात अनुकूल अहवाल न आल्यास वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा देण्यात आल्याने नापास आमदार व खासदार ‘गॅस’वर आहेत.
मागील चार वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी याच संस्थेकडून सर्वेक्षण करून घेतले जात आहे. महापालिका, जिल्हा परिषदा निवडणुकीबाबत या संस्थेने दिलेले अहवाल अचूक ठरले आहेत.
त्यामुळे आगामी निवडणुकीत उमेदवारी देताना अहवालात व्यक्त केलेल्या निष्कर्षाला महत्त्व असेल, असे भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. आगामी निवडणुकीत युती होणार की नाही याबाबत स्पष्टता नसल्याने सर्व 288 विधानसभा व 48 लोकसभा मतदारसंघांचे सर्वेक्षण करण्यात आले असून अन्य पक्षांचे आमदार व खासदार असलेल्या मतदारसंघांची सद्य राजकीय स्थिती स्पष्ट झाली आहे. पुढील दोन सर्वेक्षणात जी माहिती येईल, ती विचारात घेऊन युती करायची की स्वबळावर लढायचे, याचा निर्णय घेतला जाणार आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: