Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
शाहूपुरी पोलीस ठाण्याची वाहतूक शाखा एसपींकडून बरखास्त
ऐक्य समूह
Friday, October 12, 2018 AT 11:21 AM (IST)
Tags: lo1
5सातारा, दि. 11 :  शाहूपुरी पोलीस ठाण्यांतर्गत असणारी वाहतूक शाखा सातारा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी बरखास्त केली आहे. पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे मनुष्यबळ योग्य त्या ठिकाणी वापरले गेले पाहिजे व तक्रारदारांचे निरसन वेळेत झाले पाहिजे यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, सातारा शहरात सध्या शहर वाहतूक व शाहूपुरी ठाण्यांतर्गत अशा दोन विभागात ट्रॅफिक पोलीस कार्यरत आहेत. त्यातील शाहूपुरी पोलीस ठाण्यांतर्गत सुमारे 31 पोलिसांची नियुक्ती आहे. सुमारे दोन वर्षापूर्वी हा विभाग सुरू करण्यात आला होता. दुर्दैवाने मात्र या विभागाला पहिल्यापासून जागेची अडचण होती. त्यामुळे शहर वाहतूक विभागाच्या कार्यालयातच हा विभाग सुरू ठेवण्यात आला. सातारा शहराचा पसारा पाहता वाहतुकीला शिस्त लागणे क्रमप्राप्तच आहे. मात्र वाहतूक पोलिसांकडून दंड वसुलीचा सपाटा लावून कारवाईचा डंका पिटला जात आहे. त्याशिवाय या विभागात येण्यासाठी अनेकदा पोलिसांकडून  फिल्िंडग लावली जाते. या विभागात आलेले अनेक पोलीस प्रतिनियुक्तीवर आले असल्याचीही धक्कादायक माहिती समोर येत आहे. त्यामुळे गुरुवारी सायंकाळी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यांतर्गत असणारा वाहतूक विभाग बरखास्त करण्याचा निर्णय घेतला असून शुक्रवारपासून हा विभाग दिसणार नाही. त्यातील सुमारे 13 कर्मचारी शहर वाहतूक विभागत जातील आणि उर्वरित 18 पोलीस कर्मचारी ते आलेल्या मूळ ठिकाणी जातील. सुमारे 18 पोलीस कर्मचारी त्या, त्या पोलीस ठाण्याला जाणार आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: